राष्ट्रीय युद्ध स्मारकात अमर जवान ज्योत विलीन

|
21st January 2022, 11:46 Hrs
राष्ट्रीय युद्ध स्मारकात अमर जवान ज्योत विलीन

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील इंडिया गेटवर गेली ५० वर्षे धगधगत असलेली अमर जवान ज्योती शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जळणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली. एका संक्षिप्त समारंभात अमर जवान ज्योतीचा काही भाग इंडिया गेटपासून ४०० मीटर अंतरावर असलेल्या एनडब्ल्यूएम येथे जळत्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आला. एकात्मिक संरक्षण प्रमुख एअर मार्शल बी. आर. कृष्णा अध्यक्षस्थानी होते.

१९७१ च्या भारत-पाक युद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली. या युद्धात भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले, जिथे २५,९४२ सैनिकांची नावे सुवर्ण अक्षरात लिहिली गेली आहेत. नॅशनल वॉर मेमोरियल येथे अमर जवान ज्योतीचे विलीनीकरण करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर शुक्रवारी संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.