द्राक्षांचा केक

Story: अन्नपूर्णा | शीतल लावणीस |
22nd January 2022, 11:14 pm
द्राक्षांचा केक

मी एकदा मावशीच्या घरी दिवाळीत चार दिवस बदल म्हणून रहायला गेले. मला बघून मावशीला  खूप आनंद झाला. चहापाणी झालं. मावशी मला म्हणाली, "तुला माहीतच असेल ना गं, इथं आमच्या कॉलनीत दरवर्षी दिवाळीला खाद्यपदार्थांची स्पर्धा ठेवली जाते. यंदा म्हणे, अंड्याशिवायचा केक बनवण्याची स्पर्धा आहे. तू घेच भाग हया स्पर्धेत. तुझं गेल्या वर्षी 'शाकाहारी  पौस्टिक  केक'  प्रकाशित झालं ना, त्यातलाच एक केक निवड." कोणता केक करायचा हया विचारात असतानाच माझी नजर डायनिंग  टेबलावर  असलेल्या रसरशीत काळ्या द्राक्षांवर पडली.  ठरलं! काळ्या द्राक्षांचा  केक.

केकला लागणारे इतर सामान मावशीकडे होतेच. मी केकसाठी लागणाऱ्या जिन्नसांची  जुळवाजुळव केली. अवघ्या एका तासाच्या आत द्राक्षाचा केक तयार. मावशीनेच सजावट केली. केक नटूनथटून स्पर्धेसाठी तयार. योगायोग म्हणजे आमच्या केकच्या वेगळेपणामुळे मला चक्क पहिले बक्षीस जाहीर झाले. मावशीने तर मला मिठीच  मारली. त्याच केकची कृती आज आपण जाणून घेणार आहोत. करून बघा,  खाऊन 

बघा व आवडल्यास कळवा.



साहित्य:

१ कप  गव्हाचं  पीठ,  १ कप काळी द्राक्षे, १/२  कप साखर, ३/४  कप दूध, १/३ कप  तेल (खायचं), १  टी स्पून बेकिंग पावडर, १/२  टी स्पून बेकिंग सोडा, १  टीस्पून स्ट्राबेरीज इसेन्स, १  टी स्पून लिंबाचा रस

कृती : 

ओव्हन  १८० अंश सें. तापमानावर प्री हीट करा.

केक टीन तयार ठेवा. (तेल लावून) वरून पीठ भुरभुरा. जास्तीचे झटकून टाका.

द्राक्षे  धुवून घ्या बिया काढून मधोमध कापून घ्या.

गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र करून चाळून घ्या.

बाउलमध्ये तेल, अर्धा कप दूध,  साखर, इसेन्स, व लिंबाचा रस घालून साखर विरघळेपर्यंत  फेटून घ्या.

चाळलेले गव्हाचे पीठ बाऊलमधल्या  तयार केलेल्या मिश्रणात फेसून घ्या. उरलेले १/४ कप दूध त्यात घाला व एकाच दिशेने  चाळा.

आता त्यात कापलेली द्राक्षे मिसळा.

प्री हिट  केलेल्या ओव्हनमध्ये  केकचे मिश्रण  ३५ ते ४० मिनिटे बेक करा.

केक झाल्याची खात्री टूथपिक टोचून बघा. टूथपिक कोरडी निघाल्यास केक बेक झाला असे समजावे.