विचारांची परिपक्वता

स्वावलंबन आत्मविश्वास…या शिकविण्याच्या गोष्टी आहेत हेच मुळात समाजाला….पालकांना समजत नाही की या महत्त्वाच्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते आहे? मुल जन्माला आल्याचा आनंद आहेच परंतु त्यांचे भवितव्य घडविणे हे सुद्धा मोठे आव्हान आहे. ते पेलण्यास पालकांनी सक्षम राहायला हवे.

Story: अबोलीचे बोल | पौर्णिमा केरकर |
22nd January 2022, 11:09 pm
विचारांची परिपक्वता

वेदांगला लग्नानंतर जवळजवळ दहा वर्षांनी मुलगी झाली. इतकी वर्षे ज्या क्षणांची घरातील सारेच वाट पाहात होते तो क्षण त्यांच्या जीवनात आनंदाची अनुभूती जागविणारा होता. "मुलगा असो नाहीतर मुलगी, एखादं तरी मूल पदरात हवंच! नाहीतर घराला घरपण येत नाही." असं जो तो वेदांग त्याची बायको वेदांगीला भेटल्यानंतर सहजपणे बोलून दाखवित असे. खूप मनस्ताप व्हायचा त्या दोघांना… आणि त्यांच्या बरोबरीने घरच्यांना सुद्धा. परंतु कोणी काहीही करू शकत नव्हते. आपल्या समाजाची मानसिकताच अशी बनलेली आहे की आपण कितीही पुढारलेले आहोत म्हणून टाहो फोडला तरीही कपड्यांची आधुनिकता ही विचारातील आधुनिकतेला कमी लेखत आलेली दिसते. एकदाची त्यांना मुलगी झाली…आनंद होताच परंतु तरीही पुढे जाऊन …"खूप वर्षांनी घरात पाळणा हलला …मुलगा झाला असता तर वंशाला दिवा म्हणून आधार तरी असता. दोघांचेही आता अर्धे वय सरलेले आहे. मुलगी लग्नाची होईस्तोवर वयाची सत्तरी ओलांडणार ..कसं काय होणार कोणास ठाऊक ?" एक दीर्घ सुस्कारा सोडून त्यांच्या संसाराची सारी जबाबदारी जणू काही या लोकांवरच आहे याच अविर्भावात सारे बोलणे होते. या अशा बोलण्यावर कळस म्हणून की काय मुलीच्या बारश्याच्या दिवशी वेदांगीने तर सर्वांसमक्ष जाहीर केलं की आम्ही दोघेही परमेश्वराकडे एकच मागणे मागत आहोत की आमच्या मुलीला चांगला पैसेवाला मुलगा मिळू दे. खूप श्रीमंत घराण्यात तिचं लग्न करून दिलं की मग आम्ही मोकळे…"एक क्षण तिथं स्तब्धता पसरली. मुलीला जन्माला येऊन तर अवघा एक महिना झालेला. त्या अजाण जीवाला अजून आकारही आला नव्हता. आणि तिच्या पालकांची ही अशी मानसिकता. काय म्हणावे या विचारसरणीला ...? 

एकविसाव्या शतकात वावरत आहोत. जग डिजिटल होत असून मुलं लहान वयातच अवतीभवतीचे अनुकरण करून वेगाने सभोवतालच्या बदलाला सामोरी जाताना दिसत आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने आता तर मुलांच्या हातात मोबाईल आलेला असून चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचेच अनुकरण ती करतात. त्यात त्यांना तरी दोष देऊन काहीही साध्य होणार नाही. माहिती तंत्रज्ञानाची कितीही साधने आपल्या जवळ असली…तरीही जोपर्यंत आपापसातील संवाद प्रभावी होत नाही…मुलांचे भावविश्व समजून घेत त्यांना संस्कारसंपन्न मार्गदर्शन केले जात नाही…नवनवीन गॅझेट कशी वापरायची याविषयी त्यांना तेवढेच आत्मीयतेने सांगितले जात नाही तोपर्यंत त्यांच्यात बदल घडवून आणणे अशक्य आहे. मुलं मोबाईलमुळे बिघडली…असं सतत म्हणत राहण्यापेक्षा त्यांना मोबाईलपेक्षासुद्धा पालकांचा सहवास कसा आवडेल? किंबहुना ती आपल्या आईवडिलावर कसं प्रेम करतील याचा विचार करणे जास्त गरजेचे आहे. बारशाच्या दिवशी जिथं तिच्या लग्नाचा विषय काढला जातो …तो ही चक्क तिच्या आईकडून! या मानसिकतेला म्हणावे तरी काय? मुलांना घडवणं, त्यांना संस्कार देणं म्हणजे त्यांना खाऊपिऊ घालणे, उंची कपडे, महागड्या वस्तू खरेदी करून देणे, जंक फूडची आवड लावणे, हॉटेलिंगसाठी प्रवृत्त करणे वगैरे वगैरे…..एवढंच विश्व मर्यादित ठेवून आताचे पालक मुलांना घडवू शकत नाहीत. स्वावलंबन, आत्मविश्वा या शिकविण्याच्या गोष्टी आहेत हेच मुळात समाजाला….पालकांना समजत नाही की या महत्त्वाच्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते आहे? मुल जन्माला आल्याचा आनंद आहेच परंतु त्यांचे भवितव्य घडविणे हे सुद्धा मोठे आव्हान आहे. ते पेलण्यास पालकांनी सक्षम राहायला हवे. पाळण्यात असताना जर श्रीमंत स्थळाच्या गोष्टी एक आईच करू लागली तर मुलीचे भवितव्य अधांतरीच राहील. मध्यंतरी आपल्याच सुशिक्षित गोव्यात एका महिलेने दुसऱ्या एका महिलेचा मुलगा पळविण्याची घटना घडली होती. त्यामागे 'वंशाचा दिवा' हीच मानसिकता होती. अपत्य कोणतेही असो त्याला संस्कारी, आत्मविश्वासू, स्वावलंबी बनवून समाजयोग्य नागरिक बनवणे ही मोठी जबाबदारी पालकांची असते. परंतु पाळण्यात असताना मुलीच्या शिक्षण स्वावलंबनाचा विचार न करता तिच्या लग्नाचा विचार करणारे असे पालक …त्यांची मानसिकता भयानक आहे.

वेदांगी लग्न होऊन घरी आली….आणि भरलेले घर विस्कळीत झाले. परिवारात सर्वांना सोबत घेऊन कसे राहायचे याची शिकवण तिच्याजवळ नव्हती. म्हणून तिने सुरुवातीपासूनच स्वतःला खोलीत कोंडून घेतले. कोणाशी बोलणे नाही की स्वयंपाक करणे नाही. सासू रांधायची ते नवरा ताटात वाढून बायकोसाठी खोलीत घेऊन यायचा. मूल होणार या चाहुलीने तर ती अधिकच एकलकोंडी राहू लागली. शारीरिक हालचाल नाही, कोणाशी मनमोकळं बोलणं नाही, सतत चिडचिड, भांडण घरात नुसता कलह …गरोदरपणात जास्त भूक लागत होती त्यामुळं खाणं भरपूर व्हायचे. बायकोचे सर्व हट्ट पुरविण्यासाठी वेदांग तत्पर होताच. त्यात आता त्यांना खूप वर्षांनी बाळ होणार होतं. म्हणून तिचे लाड करण्यास तो कोणतीही कसूर करीत नव्हता. वेदांगी मात्र दिवसरात्र बसून बसून फुगली होती. मुळचीच ती वजनशीर त्यात आणखीन एका जीवाची भर पडली. नाही म्हटलं तरी तिनं स्वतःहून विविध व्याधी ओढवून घेतल्या होत्या. डॉक्टरांची औषधे आणि मुलीचं संगोपन या दोन समांतर गोष्टी करताना आर्थिक ओढाताण तर होतेच आहे पण अलीकडे वेदांगाची चिडचिड सुध्दा वाढलेली दिसते. एरव्ही दोघेही मिळून कुटुंबाशी फटकून वागत होते, आता त्या दोघांचेही पटत नाही. इतक्या वर्षानंतर घरात पाळणा हलला याचा आनंद सर्वानाच होता. मात्र वेदांगीच्या वागण्याने आनंदाचे क्षण क्लेशदायक ठरले. तिच्या आडमुठ्या वागणुकीमुळे घरातील वातावरण उदासीन असते हे मानायलाच ती तयार नाही. त्यामुळे तिच्या मानसिकतेत बदल घडून येणे अशक्यच आहे. विचारांची परिपक्वता माणसांना माणूस म्हणून जगायला शिकविते. ही परिपक्वता जर असेल तर सभोवतालच्या गोतावळ्याचा गुंतावळा होत नाही. तर त्या गुंतवळीतून नात्यांची न तुटणारी वीण तयार होते. त्यासाठी तशी मानसिकता असणे गरजेची आहे. मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करताना तिच्या लग्नाचा विचार करण्यापूर्वी तिला या विशाल जगात वावरण्यासाठी कशी प्रगल्भ करायची हे ठरवायला हवे. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय सक्षमतेने ती घेऊ शकेल एवढं बळ तिला पुरवायला हवेच. त्यासाठी पालकांनी अगोदर विचारप्रवृत्त व्हायला हवे…