हिवाळ्यातील आरोग्य आणि होमिओपॅथी

घरातली स्त्री ही घराच्या पाठीचा कणा असते. ती जर आजारी पडली तर काय घडू शकते हे बहुतेकांना माहीत आहे. म्हणूनच स्त्रियांनी आणि घरातील लोकांनी काय काळजी घ्यावी याविषयीची माहिती देणारा लेख…

Story: आरोग्य | डॉ. आरती दिनकर |
22nd January 2022, 11:03 Hrs
हिवाळ्यातील आरोग्य आणि होमिओपॅथी

हा लेख मी सर्वसमावेशक असा लिहिला आहे. पण बरेचदा स्त्रिया आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. घरात डिंकाचे लाडू, आळीवाचे लाडू किंवा मेथीचे लाडू केले तरी त्याआधी कुटुंबातील सदस्यांना देतात आणि उरले तरच त्या खातात. घरात केलेले पदार्थ सगळ्यांनी मिळूनच खावे तरच स्त्रीबरोबर कुटुंबही निरोगी राहील. पण बरेचदा बऱ्याच घरात हे असे घडून येते. म्हणूनच हे सांगण्याचा प्रपंच करीत आहे कारण घरातली स्त्री ही घराच्या पाठीचा कणा असते. ती जर आजारी पडली तर काय घडू शकते हे बहुतेकांना माहीत आहे. म्हणूनच स्त्रियांनी आणि घरातील लोकांनी काय काळजी घ्यावी याविषयी सांगणार आहे. जसे, हिवाळ्यात होणारे रोग किंवा हिवाळ्यात काय काळजी घ्यायची याचा ऊहापोह येथे करीत आहे.

हिवाळा म्हणजे "हेल्दी सीझन" असं समजलं जायचं "जायचं" हे यासाठी म्हणाले की, आता धावपळीच्या यांत्रिक, संगणक युगात आरोग्याविषयी खूप बोललं जातं, वाचलं जातं, नवीन वर्षात अनेक चांगले संकल्प केले जातात. 'प्रॅक्टिकली 'आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. खरं तर हिवाळा शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी, वजन वाढविण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. पण वाढतं प्रदूषण, व्यायामाचा अभाव, वेळी अवेळी जेवण घेणे किंवा भुकेपोटी जंक फूड खाणं, शीतपेये पिणे अशा या  बदललेल्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होतो. याउलट आरोग्य व निसर्गाचे नियम, व्यायाम, योग्य आहार- विहार, वेळच्या वेळी जेवण, पाणी पिणे व पुरेशी झोप या गोष्टी हिवाळा ऋतुत (तसे नेहमीच) आपले आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. शरीराची झीज भरून काढण्यासाठी हिवाळा हा ऋतू उत्तम असतो.

मानवाच्या आरोग्याच्या हितासाठी शरीर व मन यांची योग्य तऱ्हेने जोपासना करण्यासाठी निसर्गाने या ऋतूंची निर्मिती केली असावी असे वाटते म्हणूनच ऋतुमानानुसार फळे, भाज्या मिळतात ती त्या ऋतूत खाणे आरोग्यासाठी वरदानच ठरतात! पण सध्याच्या युगात असं होत नाही याला अनेक जण वेळेचे फुटकळ कारण सांगतात पण आरोग्य आहे तर बुद्धीचा विकास आहे हे सर्वसामान्य लोक लक्षातच घेत नाहीत. हिवाळ्यात पचनशक्ती खूप वाढते एरवी जे पदार्थ नैसर्गिकपणे पचायला जड असतात ते हिवाळ्यात सहजपणे पचतात. या काळात पित्त फारसे होत नाही पित्ताची स्वाभाविक वाढ कमी होते माणसाच्या शरीरातील उष्मा हा बाहेरच्या थंड वातावरणामुळे पोटात जातो, यामुळे पोटातील अग्नीचे संरक्षण होते. म्हणूनच या ऋतूत भरपूर भूक लागते याचे कारण हेच आहे म्हणूनच या काळात शक्तिवर्धक अन्नाचे सेवन करावयास हवे. उदाहरणार्थ डिंकाचे लाडू, मनुका, खजूर, अक्रोड ,बदाम, पिस्ता, गुळ, भेंडी, फ्लॉवर, टोमॅटो या भाज्या नियमित खाव्यात. तसेच दुग्धजन्य पदार्थ आवर्जून खावेत रबडी, आटवलेले दूध, लोणी, तूप, दही हे पदार्थ शरीरात जोम येण्यासाठी व शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी उपयुक्त आहेत. तीळ, कार्ले, खोबरे यांचाही वापर रोजच्या आहारात असावा याशिवाय गोड आंबट खारट, तुरट चव असलेल्या सगळ्या स्निग्ध पदार्थांचे सेवन केले पाहिजे अर्थात ज्यांना या गोष्टी वर्ज्य आहेत त्यांनी टाळाव्यात किंवा यातील काही पदार्थ टाळावेत उदाहरणार्थ डायबिटीस वगैरे ....

हिवाळ्यात रात्र मोठी असल्याकारणाने सकाळी लवकरच भूक लागते म्हणून भरपेट नाश्ता घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात पोटातील पाचक अग्नी खूप जास्त प्रमाणात पेटलेला असतो तेव्हा त्याला जर अन्न मिळाले नाही तर पोटात किंवा आतड्यात अल्सर होऊ शकतो याकाळात काहींना शौचास साफ होत नाही. ज्यांना अपचनाचा नेहमीच कोणत्याही ऋतूत त्रास होतो त्यांना आम्लपित्त होते ढेकर येणे, पोट फुगणे इत्यादी लक्षणे दिसतात. या काळात वातावरण थंड असते त्यामुळे सर्दी खोकला मोठ्यांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये संभवतो म्हणूनच या काळात मांसाहारी लोकांनी मासे, मटण, चिकन, अंडी प्रमाणात  खाण्यास हरकत नाही .

मुख्य म्हणजे हिवाळ्यात भूक खूप लागते म्हणून भरपूर खाणे ही होते पण व्यायाम नसेल तर मात्र शरीर सुटत जाते आणि सुस्त होते म्हणूनच व्यायाम याकाळात करणे अत्यंत हिताचे आहे विशेषतः स्त्रियांनी याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. शरीराच्या लहानमोठ्या स्नायूंना जिवंत राहण्यासाठी गतिशील रुधिराभिसरण अत्यंत गरजेचे आहे या काळात व्यायाम केल्याने माणसे आकुंचन-प्रसरण व घर्षण झाल्याने रुधिराभिसरणाला जास्त गती मिळते. प्रत्येक अवयवाला आवश्यक प्रमाणात रक्ताचा पुरवठा होऊ शकतो. म्हणूनच रक्त सबंध शरीरात व्यवस्थितरित्या खेळण्यासाठी वेगवेगळे व्यायाम करणे गरजेचे आहे .

योगासने, प्राणायामामुळे शरीर लवचिक होते तना-मनाला स्फूर्ती व उत्साह येतो कामात चपळता येते एकूणच या काळात, झेपेल तसा व योग्य पद्धतीने व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात त्वचा खरखरीत, कोरडी पडते, टाचांना भेगा पडतात यासाठी मलम वगैरे लावून काळजी घ्यावी पण बरेचदा मलम वगैरे लावूनही फारसा फायदा होत नाही, अशा वेळी होमिओपॅथीची औषधे पोटातून घेतल्यास ही लक्षणे कमी होतात. रोज सकाळी सूर्य किरणे अंगावर घेतली पाहिजेत कोवळ्या उन्हात चालल्यास व्यायाम केल्यास उत्तम पण फार उष्णता नको कोवळ्या सूर्यकिरणांमधून आपल्याला "ड" जीवनसत्व मिळते हे सर्वश्रुत आहे. आजूबाजूच्या वातावरणाला आपल्या शरीर जुळवून घेत असते आणि त्याप्रमाणात शरीराच्या क्षमता विकसित होत असतात. हिवाळ्यात हाडे दुखत असल्याची तक्रार घेऊन अनेक जण होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे येतात. बहुतांश स्त्रियांना या काळात जास्त त्रास होतो, संधिवात डोके वर काढतो, हातपाय आखडल्यासारखे होतात, सांध्यात वेदना होतात थंडीने व थंड पाण्यात काम केल्याने या तक्रारी जास्त जाणवतात. अशावेळी वेदनाशामक औषधे घेऊन तितक्या पुरते बरे वाटले तरी हिवाळ्यात वारंवार हा त्रास होतो अशावेळी होमिओपॅथीची औषधे गुणकारी ठरतात शिवाय योग्य आहारानुसार आणि व्यायामानुसार हाडे मजबूत होतात. दुसरा होणारा त्रास म्हणजे अनेकांचे हिवाळ्यात दात दुखतात गारठ्याने किंवा तोंडात उष्ण पदार्थ घेताच दातात असह्य वेदना होतात यावरही होमिओपॅथीचे औषध तात्काळ गुण देते.