राज्यात अपघाती मृत्यूंत १.३५ टक्के वाढ

२०२१ मध्ये १९.७५ टक्के अपघात अधिक; माहिती जारी

|
21st January 2022, 12:55 Hrs
राज्यात अपघाती मृत्यूंत १.३५ टक्के वाढ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात अपघाती मृत्यू टाळण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी वाहतूक विभाग, पोलीस आणि वाहतूक खात्याने विविध उपक्रम राबविले आहेत. असे असताना राज्यात २०२१ मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत १९.७५ टक्के म्हणजे ४६९ अपघात जास्त झाले आहे. तर अपघाती मृत्यूत १.३५ टक्के म्हणजे ३ मृत्यू जास्त झाले आहे. ‍
राज्यात २०२१ मध्ये ७८.२५ टक्के म्हणजे १५२ दुचाकी चालक आणि मागे बसल्याचे मृत्यू झाले आहेत. तर ९७.०८ टक्के अपघात बेफिकीर आणि निष्काळजीपणाने वाहन चालविल्यामुळे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात २०२१ मध्ये २,८४४ अपघात झाले. त्यात २२६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०२० मध्ये २,३७५ अपघातात २२३ जणांचा मृत्यू झाले होते. त्यामुळे राज्यात अपघातात १९.७५ टक्के, तर मृत्यूत १.३५ टक्के वाढ झाली आहे. २०२०च्या तुलनेत दुचाकी चालकाच्या मृत्यूत १०.४८ टक्के, दुचाकीच्या मागे बसलेल्याच्या मृत्यूत ४ टक्के, तर इतरांच्या मृत्यूत ८५.७१ टक्के घट झाली आहे. प्रवाशाच्या मृत्यूत २२० टक्के, सायकलस्वाराच्या मृत्यूत २०० टक्के, पादचाऱ्यांच्या मृत्यूत २४.१३ टक्के, चालकांच्या मृत्यूत २५ टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
२०२१ मध्ये १२८ दुचाकी चालकांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यानंतर ३६ पादचारी, २४ दुचाकीच्या मागे बसलेले, १५ चालक, १६ प्रवासी, सहा सायकलस्वार आणि एक इतरांचा समावेश आहेत. १७६ जण गंभीर, तर ४२१ जणांना किरकोळ दुखापत झाली. तर २०२० मध्ये १४३ दुचाकी चालकांचा सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यानंतर २९ पादचारी, २५ दुचाकीच्या मागे बसलेले, १२ चालक, ५ प्रवासी, दोन सायकलस्वार आणि सात इतरांचा समावेश आहेत. २०२ जण गंभीर, तर ६७८ जणांना किरकोळ दुखापत झाली होती.