गॅस वाहिनीने पेट घेतल्यामुळे रुमडामळातील नागरिकांत घबराट

हाऊसिंग बोर्ड भागात गळती : अग्निशामक दलाने मिळवले नियंत्रण


50 mins ago
गॅस वाहिनीने पेट घेतल्यामुळे रुमडामळातील नागरिकांत घबराट

गॅसवाहिनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशामक दलाचे जवान.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : रुमडामळ हाउसिंग बोर्ड भागात मारुती मंदिराच्या मागील बाजूला बुधवारी सकाळी नॅचरल गॅस वाहिनीतून गळती झाल्याने आग लागण्याची घटना घडली. मडगाव अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करत या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर संंबंधित एजन्सीने दुरुस्तीही केली. नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुधवारी सकाळी रुमडामळ हाऊसिंग बोर्ड येथील दुकानाच्या बाजूने असलेल्या उच्च दाबाच्या गॅस वाहिनीच्या व्हॉल्वमधून गॅस गळती होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. गॅस गळती मागील दोन दिवसांपासून होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले; पण आग लागण्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आणि माती टाकून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही आगीच्या ज्वाळा धुमसतच होत्या. मडगाव अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा केला. गॅसवाहिनीच्या एजन्सीला या घटनेची माहिती देण्यात आल्यावर गॅस पुरवठा बंद करून दुरुस्ती करण्यात आली. या घटनेत मोठी हानी झालेली नाही.
हाऊसिंग बोर्ड परिसरात यापूर्वीही गॅसवाहिनीतून गळती झाल्याने आग लागण्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. याशिवाय हाउसिंग बोर्ड परिसरातील अतिक्रमणांमुळे आग लागल्यास अग्निशामक दलाच्या गाडीला मार्ग उपलब्ध होत नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
घोगळ, टेकडीवरही आगीच्या घटना
मडगाव अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घोगळ येथील कुडतरकर गार्डन इमारतीतील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमधील सोफ्याला आग लागण्याची घटना घडली. दुपारी तीनच्या सुमारास घोगळ मनोविकास शाळेनजीक टेकडीवरही आग लागण्याची घटना घडून यात १५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली.