मिराबाग बंधाऱ्याविरोधी आंदोलनाला विनय तेंडुलकर यांचा पाठिंबा

गाव, मंदिर पाण्याखाली जाणार असेल, तर प्रकल्प मागे घेण्याची सूचना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
42 mins ago
मिराबाग बंधाऱ्याविरोधी आंदोलनाला विनय तेंडुलकर यांचा पाठिंबा

सांगे : मिराबाग-सावर्डे येथील जुवारी नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकल्पाविरोधात पुकारलेल्या धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. जर ग्रामस्थांना हा प्रकल्प नको असेल, तर तो लादला जाऊ नये. गाव आणि मंदिर पाण्याखाली जाणार असेल, तर सरकारने हा प्रकल्प त्वरित मागे घ्यावा, असे प्रतिपादन तेंडुलकर यांनी केले.
यावेळी तेंडुलकर यांच्यासोबत जिल्हा पंचायत सदस्य मोहन गावकर, सरपंच चिन्मयी नाईक, पंच संजय नाईक आदी होते.
मोहन गावकर म्हणाले की, बंधाऱ्याविषयीची सविस्तर माहिती ग्रामस्थांना देणे आवश्यक होते. त्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारे लोकांना रस्त्यांवर आणणे चुकीचे आहे. लोकांचा विचार करूनच बंधारा इथून हलवावा.
संतोष गावकर म्हणाले की, पूर्वजांनी राखून ठेवलेला गाव नष्ट करायला आम्ही देणार नाही. संगमेश्वराचे मंदिर नदीच्या मध्यभागी असून शिवरात्रीला तिथे जलाभिषेक पूजा होते. बंधारा झाल्यास हे मंदिर पाण्याखाली जाईल. किनारपट्टीवरील लोकांच्या हिताचा विचार न करता सरकारने हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न करू नये.

ग्रामस्थांना सविस्तर माहिती द्या : उपजिल्हाधिकारी
मिराबाग येथील आंदोलनाचे गांभीर्य ओळखून उपजिल्हाधिकारी मिलिंद वेळीप यांनी आंदोलकांचे प्रतिनिधी उपेंद्र नाईक, आपा नाईक आणि संकेत भंडारी यांच्यासह पोलीस, संबंधित अभियंत्यांची बैठक घेतली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाबाबत तांत्रिक माहिती घेऊन अभियंत्यांना आदेश दिले की, ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करा आणि त्यांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती द्या. तसेच जनसुनावणी घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन देत त्यांनी ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

बंधारा रद्द होईपर्यंत लढा कायम!

यावेळी संकेत भंडारी यांनी सांगितले की, आम्ही कायदा हातात न घेता शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहोत. जोपर्यंत हा बंधारा प्रकल्प रद्द केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.

हेही वाचा