मी खूप सहन केले आहे, पण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे : मंत्री बाबूश मोन्सेरात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
8 hours ago
मी खूप सहन केले आहे, पण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे : मंत्री बाबूश मोन्सेरात

पणजी:२०१६ मधील बहुचर्चित लैंगिक अत्याचार प्रकरणात पणजीचे भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांना मेरशे येथील विशेष न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निवाडा दिला. जवळपास दशकभर चाललेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पुरावे तपासून मोन्सेरात यांच्या बाजूने निकाल दिला.

या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडताना बाबूश मोन्सेरात यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून मी या आरोपांमुळे खूप काही सोसले आहे, परंतु माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

 हे प्रकरण २०१६ सालचे आहे. एका अल्पवयीन मुलीने आरोप केला होता की, तिच्या आईने तिला बाबूश मोन्सेरात (जे त्यावेळी सांताक्रूझचे आमदार होते) यांना विकले होते. पीडित मुलीचा असाही आरोप होता की, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी गोवा पोलिसांनी बाबूश यांच्यावर भादंवि कलम ३७६ (बलात्कार) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

या प्रकरणात जवळपास ४० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. तसेच पोलिसांनी २५० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. तपासादरम्यान पीडितेच्या वयाबाबतही वाद निर्माण झाला होता. ऑसिफिकेशन टेस्टमध्ये (हाडांच्या चाचणीत) पीडितेचे वय १६ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे समोर आल्यानंतर 'गोवा चिल्ड्रन्स ॲक्ट'मधील काही कलमे हटवण्यात आली होती, मात्र पोक्सो अंतर्गत खटला सुरू राहिला.


हेही वाचा