हॉस्पिटलांतील डॉक्टर, परिचार‌िकांची कमतरता महिन्याभरात होणार दूर

दक्षिण गोव्यातील हॉस्पिटलातील स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
हॉस्पिटलांतील डॉक्टर, परिचार‌िकांची कमतरता महिन्याभरात होणार दूर

पणजी : दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटल (South Goa District Hospital), काणकोण (Canacona), केपे  (Quepem)  येथील हॉस्पिटल तसेच उपजिल्हा हॉस्पिटलांत कमतरता असलेल्या डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची भरती महिन्याभरात करून मनुष्य बळाची कमतरता दूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

दक्षिण गोव्यातील सरकारी हॉस्पिटलांमधील साधनसुविधांची कमतरता भरून काढून दर्जा वाढवण्याचा निर्णय उच्च स्तरीय बैठकीत झाला. मुख्यमंत्री (Chief Minister)  डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली पर्वरी मंत्रालयात बुधवारी हॉस्पिटलांच्या स्थितीविषयी आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, दक्षिण गोव्यातील संबंधीत आमदार आणि आरोग्य खात्याचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. 

दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलासहीत काणकोण आणि केपेचे हॉस्पिटल तसेच फोंडा येथील उपजिल्हा हॉस्पिटलातील सुविधांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या हॉस्पिटलांत आणखी कुठल्या सुविधांची गरज आहे; त्यावर चर्चा झाली. आवश्यक असलेले डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांची भरती महिन्याभरात होणार; अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीत दिली. 

सर्व रुग्णवाहिका १०८ सेवेशी जोडणार

ग्रामीण भागात बऱ्याच वेळा वेळेत रुग्णवाहीका पोहोचत नाहीत. यावर उपाय म्हणून रुग्णवाह‌िका वाढवण्याची आवश्यकता आहे. तसेच सर्व सरकारी हॉस्पिटलांच्या रुग्णवाहिका १०८ सेवेकडे जोडणार, अशी माहिती बैठकीनंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. हॉस्पिटलांमध्ये फिजीओथेरापिस्ट, डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या विषयीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलासहीत इतर हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ उपलब्ध होणार. साधनसुविधांच्या असलेल्या कमतरतेचा आढावा घेतला. ही कमतरता दूर करून जनतेला चांगल्यात चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. 

























हेही वाचा