प्रसंगी पाण्यात उतरून कॅसिनोचे जहाज बंद पाडू : वाल्मिकी नाईक


2 hours ago
प्रसंगी पाण्यात उतरून कॅसिनोचे जहाज बंद पाडू : वाल्मिकी नाईक

पणजी : गोव्यातील (Goa) मांडवी नदीत (Mandovi River)  येणाऱ्या नवीन कॅसिनो जहाजाला (Casino Ship) स्थानिक विरोध करत आहेत. मात्र; सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. पुढील दोन दिवसांत जहाज येण्याची शक्यता आहे. जहाजाला परवानगी दिल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून अथवा पाण्यात जाऊन कॅसिनोचे जहाज बंद पाडू असा इशारा वाल्मिकी नाईक यांनी दिला.

बुधवारी स्थानिकांनी बंदर कप्तान खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन जहाजाला नदीत आणण्याची परवानगी न देण्याची मागणी केली. यावेळी सबिना मार्टिन, हरीश मडकईकर, जॅक सुखिया व अन्य उपस्थित होते. 

वाल्मिकी नाईक म्हणाले की, सरकारने (Government) नव्या कॅसिनोला परवानगी देणार नसल्याचे म्हटले आहे. असे असले तरी जुन्या परवान्यावर नवे जहाज आणले जाणार आहे. जुने जहाज लहान होते. नवीन येणारे जहाज तुलनेने खूप अधिक मोठे आहे.

एका अर्थाने येथील एक लहान जहाज जाऊन त्याऐवजी सहा जहाजे येण्यासारखेच आहे. याआधी आम्ही पणजी महापालिकेला जहाजाला विरोध करण्याची विनंती केली आहे. आज आम्ही बंदर कप्तानाना भेटून हीच मागणी केली आहे. स्थानिकांना गृहीत धरल्यास आम्हाला आंदोलन करावेच लागेल. 

हरीश मडकईकर म्हणाले की, रेईश मागूश पंचायतीने २८ जानेवारी रोजी बंदर कप्तान खात्याला मोठ्या जहाजाला परवानगी देऊ नये; असे पत्र लिहिले होते. खात्याने ९ फेब्रुवारी रोजी दिलेल्या उत्तरानुसार जहाजाला राज्य सरकारने परवानगी दिली असून; हा विषय खात्याच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. नव्या जहाजाबद्दल प्रत्येक जण हात वर करत आहेत. पणजीसह, रेईश मागूश, रायबंदर, चोडण येथील नागरिकांनी देखील या कॅसिनो जहाजाला विरोध करणे आवश्यक आहे. 

कॅसिनोवर नजर ठेवणार 

सबिना मार्टिन म्हणाल्या की, मोठ्या कॅसिनो जहाजामुळे पणजीतील समस्या वाढणार आहेत. येथील वाहतूक कोंडी, कचरा प्रश्न, गुन्हे वाढणार आहेत. यामुळे आम्ही याला विरोध करत आहोत. पुढील काही दिवसांत नदीत नवीन जहाज येण्याची शक्यता असून; आम्ही त्यावर नजर ठेवणार आहोत. या प्रश्नी आमदार तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.

























हेही वाचा