पणजी महापालिका निवडणूक; भाजप समर्थित पॅनलमध्ये असतील ५० टक्के नवीन व युवा चेहरे

आमदार बाबुश मोन्सेरात यांची माहिती.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
पणजी महापालिका निवडणूक; भाजप समर्थित पॅनलमध्ये असतील ५० टक्के नवीन व युवा चेहरे

पणजी : महापौर रोहित मोन्सेरात, उदय मडकईकर आणि संजीव नाईक यांचे प्रभाग आरक्षित झाल्यानंतर भाजप समर्थक पॅनलचे ५० टक्के उमेदवार नवीन असतील, असे सूतोवाच महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केले आहे. यावेळी युवा चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पणजी महापालिका निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी निवडणूक मार्चमध्ये होणार आहे. प्रभाग रचनेबरोबरच आरक्षणाची अधिसूचना जारी झाल्याने इच्छुकांनी तयारीला वेग दिला आहे. सुरेंद्र फुर्तादो, जॉएल आंद्राद आणि उदय मडकईकर यांच्यासह विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने यावेळी निवडणुकीचे चित्र बदलणार आहे.

या पार्श्वभूमीवर, आपले पॅनल सर्व ३० प्रभाग जिंकणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केला आहे. पक्षाशी चर्चा करून मी पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे. यावेळी ५० टक्के उमेदवार नवीन तसेच युवा असतील. पक्षाच्या पाठिंब्यामुळे निश्चितपणे सर्व उमेदवार विजयी होतील, असे ते म्हणाले.

पणजी महापालिका निवडणुकीत आपलेही पॅनल उतरवणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. यावर भाष्य करताना बाबूश मोन्सेरात म्हणाले की, लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. मागील वेळीही बरेच जण विरोधात होते; यावेळीही असले तरी काही फरक पडणार नाही.

हेही वाचा