
पणजी : गोव्यात (Goa) सुरू असलेल्या पर्यावरण (Environment) रक्षणाच्या आंदोलनाला निवृत्त कर्मचारी संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. न्या. फेर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘गोवा वाचवा’ चळवळीला संघटनेचा ठाम पाठिंबा असल्याची घोषणा करण्यात आली.
पणजी (Panjim) येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे प्रतिनिधी आल्वितो डिसोझा (माजी संचालक, तांत्रिक शिक्षण संचालनालय) यांनी ही भूमिका स्पष्ट केली. रिअल इस्टेट लॉबीकडून गोव्याच्या जंगल (Forest) व पर्यावरणावर गंभीर आघात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारसह (Government) काही विरोधी आमदारही या प्रक्रियेत सहभागी असल्याने; परिस्थिती अधिक चिंताजनक बनल्याचे ते म्हणाले.
दाट जंगल क्षेत्रे व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्पांना मंजुरी दिली जात असल्याचे डिसोझा यांनी नमूद केले. वनखात्याचे मुख्य कार्य झाडांचे संरक्षण करणे असताना, उलट झाडे तोडण्यासाठी परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. खाजगी जंगल क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळ्यात गावस्तरीय जैवविविधता समित्यांकडून वृक्षारोपण केले जाते; मात्र; फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये गवत सुकल्याने आगी लागून नव्याने लावलेली झाडे नष्ट होतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या आगीत लहान प्राणी, कीटक व जैवसाखळीचा मोठा नाश होत असल्याचे त्यांनी सांगितले.
खनिज उत्खनन बंद झाल्यानंतर काही प्रमाणात सावरणाऱ्या गोव्याच्या नैसर्गिक संपत्तीवर पुन्हा एकदा रिअल इस्टेट लॉबी, विकासक आणि बिल्डर यांचे डोळे लागल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार आणि विरोधक यांच्यातील संगनमतामुळे या विनाशाला अधिक वेग मिळत असल्याची टीका त्यांनी केली.
“गोव्याचा होत असलेला पर्यावरणीय विनाश थांबविण्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी न्या. रिबेलो यांची चळवळ आशादायी वाटते. मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले तर सकारात्मक बदल घडवता येऊ शकतो,” असे डिसोझा म्हणाले. निवृत्त कर्मचारी संघटनेने या चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.