प्रदूषणाविरोधात स्थानिक एकवटले

वास्को : मुरगावात (Mormugao) होणारे कोळसा प्रदूषण (Coal Pollution), दुर्गंधी रोखण्यासाठी कंपनीला ३ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत दुर्गंधी न रोखल्यास हजारो नागरिकांसह बंदर रोखण्याचा इशारा देण्यात आला.
कोळसा प्रदूषण, दुर्गंधीमुळे मुरगाव परिसरातील स्थानिकांना फटका बसत आहे. या परिसरात पसरलेली दुर्गंधी कोळशामुळेच असल्याचा दावा करीत स्थानिकांनी आज बुधवारी आंदोलन केले. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर (Mla Sankalp Amonkar) यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक एकवटले होते.
यासंदर्भात माहिती देताना आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले की, मुरगावात काही ठिकाणी दुर्गंधीचा वास येत असून, कोळसा प्रदूषणामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. कोळसा प्रदूषणाचा जबर फटका स्थानिकांना बसत आहे. येथील प्रदूषण, येत असलेली दुर्गंधी तीन दिवसांत बंद न केल्यास मोठ्या संख्येने लोकांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा आमदार आमोणकर यांनी दिला.
कोळसा प्रदूषणाच्या नावावर काहीजण राजकारण करू पाहत आहेत. आपल्यावरही आरोप केले जात आहेत. मात्र, मुरगावात कोळसा प्रदूषण वाढण्यास कोण कारणीभूत आहे व कुणी चालना दिली, याठिकाणी कुणाचे व्यवसाय आहेत हे सर्व जनतेला माहित आहे. आपण नेहमीच कोळसा प्रदूषणाविरोधात असून, यासंदर्भात नेहमीच विधानसभेत आवाज उठवला आहे.
यापुढेही आपली हीच भूमिका कायम राहणार आहे. कोळसा प्रदूषणाविरोधात आवाज उठवण्यासाठी स्थानिकांबरोबर नेहमीच उभा राहणार असल्याचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले. कोळसा हाताळत असलेल्या कंपनीला निवेदन सादर केले आहे. तीन दिवसांत उपाययोजना न केल्यास लोकांना घेऊन बंदराच्या गेटमध्ये घुसणार व कोळसा हाताळणीचे काम थांबवण्यात येणार असल्याचा इशारा आमदार संकल्प आमोणकर यांनी दिला.