
पणजी : बिट्स पिलानी शिक्षण संस्थेमध्ये (BITS Pilani Education Institute) डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान सहा विद्यार्थ्यांनी (Students) आत्महत्या केल्या आहेत. या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे.
सर्व चौकशी अहवाल सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावेत; अशी मागणी गोवा फॉरवर्ड (Goa Forward) युवा विभागाचे हृतिक मांद्रेकर यांनी केली. याविषयी पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल पुसापती गजपती अशोक राजू यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.
मांद्रेकर यांनी सांगितले की, बिट्स पिलानीमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. पहिल्या आत्महत्येनंतर भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी संस्थेने काय केले याची माहिती मिळाली पाहिजे. संस्थेने उपाय योजना केल्या असतील तरी देखील आत्महत्या का होत आहेत याचे उत्तर देखील मिळणे आवश्यक आहे.
आत्महत्या रोखण्यात ही शिक्षण संस्था आणि सरकार देखील अपयशी ठरत आहे. आत्महत्यांमुळे गोव्याचे नाव खराब होत आहे. ते म्हणाले, आम्ही केलेल्या अभ्यासानुसार या आत्महत्या परीक्षा जवळ आलेल्या कालावधीत झालेल्या आहेत. यामध्ये ताणतणाव हा एक भाग असू शकतो. उद्या अन्य संस्थांमध्ये देखील असे होऊ शकते.
हे टाळण्यासाठीच सर्व चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे; असे झाल्यास अन्य संस्था, विद्यार्थ्यांना आत्महत्या प्रकरणांची नेमकी कारणे समजून ती रोखण्यासाठी काय करावे लागेल हे समजेल. राज्यपालांनी आम्हाला याप्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगितले आहे. आम्ही १५ दिवसांनी पुन्हा याचा पाठपुरावा करणार आहोत.