सरकारी कर्मचारी संघटना संतप्त : मुख्यमंत्र्यांना पत्र सादर

पणजी : व्यावसायिक कर खात्यात 'कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर' आणि 'स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर' पदांवर बढती देण्यासाठी परीक्षा घेऊन ६ महिने झाले, तरी अद्याप आदेश जारी करण्यात आलेले नाहीत. परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही बढतीचे आदेश रखडल्याने सरकारी कर्मचारी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
बढतीचे आदेश तातडीने लागू करून पात्र कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्रही लिहिले आहे.
व्यावसायिक कर खात्याने ४ ऑगस्ट २०२५ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत बढतीसाठी परीक्षा घेतली होती. परीक्षेच्या चार महिन्यांनंतर, डिसेंबरमध्ये निकाल जाहीर झाला. परीक्षेतील गुणांनुसार गुणवत्ता यादी देखील तयार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप बढतीचे आदेश देण्यात आलेले नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी
सरकार कर्मचारी भरती आयोगाद्वारे नवीन कर्मचाऱ्यांची भरती करत आहे, मात्र दोन वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना बढती दिली जात नाही. हा अन्याय आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात हस्तक्षेप करून बढतीचे आदेश देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.