पणजी महापालिका प्रभाग आरक्षणानंतर भाजपमध्ये धुसफूस

बंडखोरीची शक्यता वाढली : पक्षाच्या पाठिंब्याने बाबूश पॅनेल उभे करणार


33 mins ago
पणजी महापालिका प्रभाग आरक्षणानंतर भाजपमध्ये धुसफूस

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पणजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागांचे आरक्षण मंगळवारी जाहीर झाले. त्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. सध्याच्या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची घोषणा मंत्री व स्थानिक आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी केल्यानंतर पक्षाच्या पणजी मंडळात तसेच जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता वाढली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या सोमवारी पणजी महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात ही निवडणूक होणार आहे. पणजी महापालिकेबाबत पक्ष कोणताही निर्णय बाबूश मॉन्सेरात यांच्याशी चर्चा केल्याशिवाय घेत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापालिका निवडणुकीत स्थानिक आमदार मॉन्सेरात जे उमेदवार निश्चित करतील, त्यांनाच पक्षाचा पाठिंबा दिला जाईल, असे संकेत मिळत आहेत.
मॉन्सेरात यांनी सर्व ३० प्रभागांत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपमधील जुने कार्यकर्ते व मंडळ समितीतील अनेकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. पणजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत असून, येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित
महापौर रोहित मॉन्सेरात, उदय मडकईकर, संतोष सुर्लीकर आणि नीलेश मोरजकर यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना इतर प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. बहुतांश विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


निवडणुकीत ५० टक्के नवे चेहरे देणार : बाबूश
पणजी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या पाठिंब्यानेच पॅनेल उभे केले जाणार आहे. ५० टक्के उमेदवार नवे असतील, तसेच तरुणांना संधी दिली जाईल, अशी घोषणा आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी केली आहे. कोणीही पॅनेल उभे केले किंवा उमेदवारी अर्ज भरला तरी त्याचा आम्हाला फरक पडत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, असे उत्पल पर्रीकर यांच्या घोषणेबाबत आमदार बाबूश मॉन्सेरात म्हणाले.


तुल्यबळ उमेदवारांचे पॅनल उतरवणार : उत्पल पर्रीकर
मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांच्या उमेदवारांना टक्कर देऊ शकतील अशा उमेदवारांचे पॅनल मी महापालिका निवडणुकीत उतरवणार आहे. आवश्यकता भासल्यास काँग्रेससह इतर पक्षांचा पाठिंबा घेतला जाईल. उमेदवारांची चाचपणी सुरू असून तारीख जाहीर होताच पॅनल जाहीर केले जाईल. पणजीचा विकास करण्याची तळमळ व कार्यक्षमता यांचा विचार करून उमेदवारांची निवड केली जाईल, असे उत्पल पर्रीकर यांनी म्हटले आहे.