पीडितेच्या जबाबात विसंगती : साक्षीदारांनी जबाब फिरवल्याचा परिणाम

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पीडित मुलीने विविध टप्प्यांवर दिलेल्या जबाबात विसंगती आहे. नमूद केलेल्या तक्रारीत काल्पनिक कथा असल्याचे तिने स्वतःच कबूल केले. त्यामुळे तिच्या आरोपांबाबत विश्वसनीय पुरावा समोर आला नाही. तसेच साक्षीदारांनी जबाब फिरविले. याशिवाय वैद्यकीय आणि न्यायवैद्यक पुरावे संशयिताशी थेट जुळले गेले नाहीत, असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील विशेष न्यायालयाने पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मॉन्सेरात यांच्यासह रोझी फेरोस यांना २०१६ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणातून पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. ईर्शाद आगा यांनी बुधवारी दिला.
पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार ४ मे २०१६ रोजी दाखल झाली होती. त्यानुसार, सहसंशयित रोझी फेरोस हिने तिला महागडे मोबाईल, कपडे देण्याचे आमिष दाखवून तिचे अर्धनग्न फोटो काढून ते व्हॉट्सअॅपवरून बाबूश यांच्या मोबाईलवर पाठवून दिले, असा आरोप करण्यात आला होता. तसेच पीडितेला ५० लाख रुपयांना बाबूश यांना विकण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्या बदल्यात फ्लॅट, मोटारसायकल व पैशांचे आश्वासन देऊन फार्म हाऊसमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याची दखल घेऊन पणजी महिला पोलिसांनी बाबूश मॉन्सेरात यांच्यासह इतरांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलम, बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पोक्सो) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी बाबूश आणि सहसंशयिताला अटक केली होती. १३ दिवसांनंतर १८ मे २०१६ रोजी दोघांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून १८ जुलै २०१८ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यात सुमारे ५१ साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आली होती. न्यायालयात त्यातील २९ जणांची उलटतपासणी करण्यात आली. संशयितातर्फे अॅड. दामोदर धोंड आणि अॅड. अनुप कुडतरकर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी निवाडा दिला. या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण
पीडित मुलीचे बिगर सरकारी संस्थेने तीन वेळा, पोलिसांनी चार वेळा आणि न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दोन वेळा, असे एकूण नऊ वेळा जबाब नोंद करण्यात आले. पीडितेने वेगवेगळ्या टप्प्यांवर दिलेले जबाब परस्परविरोधी आणि विसंगत होते. एका जबाबात ती बेशुद्ध झाल्याचे सांगते, तर दुसऱ्या जबाबात पूर्ण वेळ शुद्धीवर असल्याचे सांगते.
पंच साक्षीदारांनी न्यायालयात जबाब फिरविले.
अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास पोलीस अपयशी ठरले. उदा. फार्म हाऊसमध्ये तिला कोण घेऊन गेले ? घटनेचा नेमका कोणता दिवस होता ? ज्या दिवशी तिला नेण्यात आले, त्यावेळी कोण-कोण उपस्थित होते ? कोणत्या गाडीने तिला परत सोडले ?
वैद्यकीय आणि न्यायवैद्यक अहवालातूनही संशयित बाबूश यांच्याशी जोडणारा ठोस पुरावा मिळाला नाही.
गेल्या सुमारे दहा वर्षांपासून मी लैंगिक अत्याचाराच्या आरोपामुळे खूप काही सोसले आहे. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. अखेर न्यायदेवतेने मला न्याय दिला.
_ बाबूश मॉन्सेरात, आमदार, पणजी