कदंबच्या २०० जुन्या बसची जागा घेणार नव्या ई-बस

जुन्या बस टप्प्याटप्प्याने काढणार भंगारात; २७ ई-बस, ७ डिझेल बस लवकरच सेवेत


47 mins ago
कदंबच्या २०० जुन्या बसची जागा घेणार नव्या ई-बस

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कदंब परिवहन महामंडळाच्या सुमारे २०० जुन्या बसची मुदत संपल्याने त्या टप्प्याटप्प्याने सेवेतून कमी करण्यात येणार आहेत. त्यांच्या जागी नव्या इलेक्ट्रिक बस (ई-बस) दाखल केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.
वर्ष २०२७ पर्यंत १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या बस सेवेतून पूर्णपणे काढून टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जुन्या बसची जागा भरून काढण्यासाठी नव्या ई-बस खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कदंबचा ताफा आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी २०२७ पूर्वीच सर्व जुन्या बसची जागा नव्या बसनी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तुयेकर यांनी स्पष्ट केले.


१५० ई-बसची ऑर्डर; २७ लवकरच दाखल
कदंब महामंडळाने ‘ओलेक्ट्रा’ कंपनीकडे १५० ई-बसची ऑर्डर दिली असून त्यापैकी २७ बस लवकरच कदंबच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. याशिवाय आणखी १०० ई-बस खरेदीसाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. काही मार्गांवर प्रवाशांची संख्या कमी असल्याने मोठ्या बसऐवजी २८ आसनी ७ लहान बस घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
१५ दिवसांत ३४ बस सेवेत
शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच राज्यातील विविध मार्गांवर धावणाऱ्या १५ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या बस आता निकामी होत आहेत. त्यामुळे पुढील १५ दिवसांत २७ ई-बस आणि ७ डिझेल बस सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे, असेही आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले.
डिझेल बसचीही तरतूद
काही भागांमध्ये इलेक्ट्रिक बस चालविणे शक्य होत नाही. त्या ठिकाणी डिझेल बसच आवश्यक असतात. यासाठी डिझेल बस खरेदी करण्याची तरतूद करण्यात आली आहे. बस खरेदीसाठी कदंब महामंडळाने निधीतून काही रक्कम बस खरेदीसाठी काढून ठेवली आहे. उर्वरित निधी उपलब्ध होताच डिझेल बस खरेदीचा निर्णय अमलात आणला जाईल.