गोव्याची मागणी : मंत्री मॉविन गुदिन्होंनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करताना वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो. सोबत खासदार सदानंद शेट तानावडे.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दाबोळी विमानतळाच्या परिघातील बांधकाम बंदीचे असलेले निर्बंध ५०० मीटरवरून १० मीटरवर आणण्याची मागणी गोवा सरकारने केली आहे. वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी मंगळवारी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन ही मागणी केली. यावेळी खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.
या भेटीत दाबोळी विमानतळाचा विस्तार आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन संरक्षणमंत्र्यांना दिले, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले. नौदलाच्या इतर विमानतळांच्या क्षेत्रात १० मीटर परिघाच्या बाहेर बांधकामांना परवानगी आहे; मात्र केवळ दाबोळी विमानतळाच्या बाबतीत हे निर्बंध ५०० मीटरपर्यंत आहेत. हे निर्बंध कमी करण्याची मागणी करण्यात आली.
दाबोळी विमानतळावर सकाळी चार तास आणि संध्याकाळी एक तास नागरी विमानांची वाहतूक बंद असते. यामुळे विमानांची संख्या वाढवता येत नाही. ही बंदी उठवण्याची मागणीही करण्यात आली आहे. जीएमआर कंपनी दबाव आणून दाबोळीवरील विमानांचे मोपावर स्थलांतरण करत आहे. दाबोळी विमानतळ २४ तास खुला राहिला, तर येथील विमानांची संख्या नक्कीच वाढेल, असे वाहतूकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
संरक्षणमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
दाबोळी विमानतळ बंद होणार असल्याच्या अफवा वेळोवेळी पसरत असतात. या पार्श्वभूमीवर महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आपण संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली होती. तेव्हा राजनाथ सिंह यांनी ‘दाबोळी विमानतळ बंद होणार नाही’, असे आश्वासन दिले होते. खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत पुन्हा निवेदन सादर करण्यात आले असून, संरक्षणमंत्र्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.