रोहित मॉन्सेरात, उदय, बन्सी, संजीव नाईक यांचे प्रभाग आरक्षित

पणजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर


3 hours ago
रोहित मॉन्सेरात, उदय, बन्सी, संजीव नाईक यांचे प्रभाग आरक्षित

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पणजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. आरक्षणाचा फटका काही विद्यमान नगरसेवक व दिग्गजांना बसण्याची शक्यता आहे. महापौर रोहित मॉन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, उदय मडकईकर, संतोष उर्फ बन्सी सुर्लीकर यांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. महापालिकेत एकूण ३० प्रभाग असून पणजी विधानसभा मतदारसंघ आणि ताळगाव विधानसभा मतदारसंघातील काही भाग महापालिका क्षेत्रात येतो.
महापौर रोहित मॉन्सेरात यांचा प्रभाग क्रमांक ३ ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. उपमहापौर संजीव नाईक यांचा प्रभाग २५ महिलांसाठी राखीव झाला आहे. नेल्सन काब्राल यांचा प्रभाग १ एसटी महिलांसाठी राखीव झाला आहे. सुरेंद्र फुर्तादो यांचा प्रभाग ६, जॉएल आद्रांदे यांचा प्रभाग ८ आणि उदय मडकईकर यांचा प्रभाग १४ ओबीसीसाठी राखीव झाला आहे. नीलेश मोरजकर यांचा प्रभाग १९ महिलांसाठी राखीव झाला आहे. संतोष उर्फ बन्सी सुर्लीकर यांचा प्रभाग २३ महिलांसाठी राखीव झाला आहे.
विद्यमान नगरसेवक प्रसाद आमोणकर यांचा प्रभाग १०, करण पारेख यांचा प्रभाग ११, प्रमय माईणकर यांचा प्रभाग १३, जॉर्ज एडवर्ड यांचा प्रभाग १७, वसंत आगशीकर यांचा प्रभाग २० आणि विठ्ठल चोपडेकर यांचा प्रभाग २८ यामध्ये फेरबदल झालेला नाही. त्यामुळे या सहाही नगरसेवकांना निवडणुकीत उभे राहता येणार आहे.
प्रभाग १५ च्या सयानी चोपडेकर, प्रभाग १६ च्या अस्मिता केरकर, प्रभाग २० चे शुभम चोपडेकर, प्रभाग २१ च्या मनीषा मणेरकर, प्रभाग २२ च्या दीक्षा माईणकर यांच्या प्रभागात फेरबदल झाला आहे. तरीदेखील आरक्षणामुळे किंवा प्रभाग सामान्य उमेदवारासाठी खुला केल्यामुळे या नगरसेवकांना निवडणूक लढवता येणार आहे.
काही नगरसेवकांमध्ये प्रभागांची अदलाबदल शक्य
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापौर रोहित मॉन्सेरात यांचा प्रभाग ३ ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे, तर कॅरोलिना पो यांचा प्रभाग ४ सामान्य उमेदवारासाठी खुला झाला असल्यामुळे महापौर मॉन्सेरात आणि कॅरोलिना पो यांचे प्रभाग अदलाबदल होण्याची शक्यता आहे. उदय मडकईकर यांचा प्रभाग १४ ओबीसींसाठी राखीव झाला आहे. प्रभाग १२ सामान्य उमेदवारासाठी खुला झाला आहे. त्यामुळे प्रभाग १२ च्या वर्षा शेट्ये आणि उदय मडकईकर यांच्यातही प्रभागांची अदलाबदल होऊ शकते. आगामी महापालिका निवडणुकीत विद्यमान नगरसेवक आदिती चोपडेकर, नीलेश मोरजकर, संजीव नाईक, युवराज फर्नांडिस, प्रांजल नाईक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.