पोलीस बंदोबस्त असूनही ग्रामस्थांनी यंत्रसामग्री हटवून कंत्राटदाराला हाकलून लावले

मिराबाग–सावर्डे येथे बंधाऱ्याचे काम बंद करण्यासाठी आलेले लोक. (संदीप मापारी)
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
सांगे : मिराबाग–सावर्डे येथील जुवारी नदीवर प्रस्तावित बंधाऱ्याच्या कामाला स्थानिकांनी तीव्र विरोध करून सोमवारी सकाळी काम बंद पाडले. स्थानिकांचा विरोध असतानाही काम सुरू ठेवल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलीस बंदोबस्त असूनही संतप्त ग्रामस्थांनी कामासाठी आणलेली यंत्रसामग्री हटवून कंत्राटदाराला तेथून हाकलून लावले.
दीड वर्षांपासून हा बंधारा वादाच्या केंद्रस्थानी आहे. बंधारा झाल्यास गावात पूरस्थिती निर्माण होण्याची, संगमेश्वर मंदिर पाण्याखाली जाण्याची तसेच किनारपट्टीवरील पाच गावांना धोका निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बैठका, जनजागृती आणि सभा घेण्यात आल्या. रविवारी झालेल्या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्थानिकांनी ‘आमचा गाव आम्हाला हवा, बंधारा नको’ अशा घोषणा दिल्या होत्या.
पिण्याच्या पाण्यासाठी बंधाऱ्याची गरज नाही. पंपहाऊस व जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करता येऊ शकतो. मात्र, कोणाच्या तरी फायद्यासाठी हा प्रकल्प रेटला जात आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांचा इशारा
कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सरकारने कागदपत्रे व अधिकृत माहिती दाखवावी. प्रकल्पाबाबत ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम सुरू केल्यास तीव्र आंदोलन सुरू केले जाईल. प्राण गेला तरी मागे हटणार नाही. बंधाऱ्याला विरोध कायम राहील, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.