शिक्षण खाते - कर्मचारी भरती आयोगात समन्वय नाही

शिक्षक पदांसाठी अनुभव निकषाबाबत भिन्न मते


3 hours ago
शिक्षण खाते - कर्मचारी भरती आयोगात समन्वय नाही

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : शिक्षण खाते आणि कर्मचारी भरती आयोगामध्ये (एसएससी) शिक्षक भरती पात्रतेविषयी समन्वय नसल्याने शिक्षक पदासाठी पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे. प्राथमिक शिक्षक पदासाठी अनुभवी उमेदवार मिळाला नाही, तर अननुभवी बी.एड. वा डी. एड. धारकांची नियुक्ती होऊ शकते, असे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे. मात्र अनुभवाची अट पात्रता निकषात असल्याने अनुभवाचे प्रमाणपत्र नसलेले अर्ज स्वीकृत होणार नाहीत. त्यामुळे शेकडो बी.एड. आणि डी.एड. धारकांना प्राथमिक शिक्षक पदांसाठी अर्ज करणे अशक्य झाले आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
राज्य कर्मचारी भरती आयोगान कोकणी शाळामध्ये ३८, तर मराठी प्राथमिक शाळांमध्ये ३५२ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपात २० फेब्रुवारीपर्यंत https://gssc.goa.gov.in या वेबसाईटवर अर्ज भरून सादर करणे आवश्यक आहे. शिक्षक पदासाठी उच्च माध्यमिक परीक्षा पास होण्यासह बी.एड. वा डी.एड.धारक व दोन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. त्यामुळे अनुभव नसलेले बी.एड. आणि डी.एड.धारक या पदांसाठी अपात्र ठरतात. अनुभवी उमेदवार मिळाले नाहीत तर अनुभव नसलेल्यांना सेवेत घेण्याची तरतूद आहे, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी स्पष्ट केले. अशी तरतूद असूनही कर्मचारी भरती आयोगाने दोन वर्षांच्या अनुभवाची अट कशी घातली, असे विचारले असता, शिक्षण खात्याकडून आलेल्या निकषाच्या आधारे पात्रतेची अट निश्चित केली, अशी माहिती कर्मचारी भरती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य मिळेल; मात्र अनुभवी उमेदवार आवश्यक त्या प्रमाणा उपलब्ध झाले नाही तर अनुभव नसलेल्यांना घेणे शक्य आहे, असे शिक्षण खाते म्हणते. कर्मचारी भरती आयोगाच्या जाहिरातीत मात्र अनुभव नसलेल्यांना अर्ज करण्याची तरतूदच नाही. यामुळे उमेदवारांत मात्र संभ्रमाचे वातावरण आहे.
पात्रतेच्या निकषाबाबत स्पष्टतेचा अभाव
आवश्यक त्या प्रमाणात अनुभवी उमेदवार मिळाले नाहीत, तर अनुभव नसलेल्या उमेदवारांना शिक्षक सेवेत घेण्याची तरतूद आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली. शिक्षण खात्याकडून आलेल्या निकषाच्या आधारेच प्राथमिक शिक्षक पदासाठीच्या पात्रतेची अट निश्चित करण्यात आली आहे, असे कर्मचारी भरती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा