गोमंतकीयांच्या बँक ठेवीत ८ हजार कोटींची वाढ

एसएलबीसी अहवालातून स्पष्ट : एका वर्षात ४३,७८४ कोटी रुपयांची कर्जेही वितरित


09th February, 11:54 pm
गोमंतकीयांच्या बँक ठेवीत ८ हजार कोटींची वाढ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील काही वर्षांत पैसे गुंतवण्याच्या पद्धतीत बदल होत गेले आहेत. पारंपरिक बँक खात्यापेक्षा म्युच्युअल फंड, शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी गोव्यात बँक खात्यातील ठेवींमध्येदेखील वाढ होत आहे. एका वर्षात गोमंतकीयांच्या बँक बॅलन्समध्ये ८,६२७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. राज्य स्तरीय बँक समितीच्या (एसएलबीसी) अहवालातून ही माहिती मिळाली आहे. समितीमध्ये राज्यातील ४६ बँकांचा समावेश आहे. यात १२ राष्ट्रीयकृत, १७ खासगी, १२ सहकारी, तर ५ लघू वित्त बँकांचा समावेश आहे.
अहवालानुसार, ३० सप्टेंबर २०२४ अखेरीस गोमंतकीयांच्या राज्यातील विविध बँकांमध्ये १.२१ लाख कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. ३० सप्टेंबर २०२५ मध्ये त्यात वाढ होऊन त्या १.२९ लाख कोटी रुपये झाल्या. वरील कालावधीत बँक ठेवींमध्ये ७.१० टक्के वाढ झाली आहे. राज्यातील एकूण ठेवींपैकी ६७.७४ टक्के ठेवी या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आहेत. याशिवाय खासगी बँकांत २७.९६ टक्के, सहकारी बँकांत ४.९२ टक्के, तर लघू वित्तीय बँकांत सर्वांत कमी म्हणजेच केवळ ०.३७ टक्के ठेवी होत्या.
मागील एका वर्षात बँकांतर्फे वितरित करण्यात आलेल्या कर्जांच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. राज्यातील बँकांनी ३० सप्टेंबर २०२४ अखेरीस ३९ हजार ६३० कोटी रुपयांची कर्जे वितरित केली होती. ३० सप्टेंबर २०२५ अखेरीस ४३ हजार ७८४ कोटी रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली आहेत. सप्टेंबर २०२५ अखेरीस कर्जे देण्यातदेखील राष्ट्रीयकृत बँका अग्रेसर राहिल्या. एकूण कर्जापैकी राष्ट्रीयकृत बँकांनी ६०.९८ टक्के, खासगी बँकांनी २९.७५ टक्के, सहकारी बँकांनी ८.८३ टक्के, तर लघु वित्तीय बँकांनी ०.४२ टक्के कर्जे वितरित केली आहेत.
सीडी रेशो वाढला
सप्टेंबर २०२४ अखेरीस राज्यातील बँकांचे कर्ज आणि ठेवींचे गुणोत्तर (सीडी रेशो) ३२.६६ टक्के होते. सप्टेंबर २०२५ अखेरीस ते १.०२ टक्क्यांनी वाढून ३३.६८ टक्के झाले. याचाच अर्थ गतवर्षीच्या तुलनेत यंदा बँकांनी अधिक कर्जे वितरित केली आहेत.

हेही वाचा