शिक्षण सोडलेल्या आठवी उत्तीर्णांना दहावी उत्तीर्ण होण्याची संधी


09th February, 11:59 pm
शिक्षण सोडलेल्या आठवी उत्तीर्णांना दहावी उत्तीर्ण होण्याची संधी


मुख्यमंत्री : प्रत्येक तालुक्यात एका विद्यालयाची व्यवस्था करणार
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बऱ्याच वर्षांपूर्वी आठवी उत्तीर्ण होऊन शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना आता गोवा शालान्त मंडळातर्फे दहावी परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील एक विद्यालय या विद्यार्थ्यांसाठी केंद्र म्हणून निश्चित केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
शालान्त मंडळाच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. बऱ्याच वर्षांपूर्वी नववी वा दहावीत अनुत्तीर्ण होऊन शिक्षण सोडून दिलेले बरेच जण इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसतात. शालान्त मंडळातर्फे दहावी परीक्षेला बसण्याची सोय असली तरी किचकट सोपस्कार असल्याने ते परराज्यांतील केंद्रामार्फत इतर मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसतात. यासाठी ते ३० हजार रुपयांपर्यंत खर्च करतात.
शिक्षण सोडून दिलेल्या वयस्क विद्यार्थ्यांना गोवा शालान्त मंडळातर्फे दहावी उत्तीर्ण होणे शक्य व्हावे म्हणून प्रत्येक तालुक्यात एका विद्यालयाची व्यवस्था केली जाईल. कौशल्यविकास विषयांसह प्रात्यक्षिक परीक्षा देण्याची सोय एकाच विद्यालयात केली जाईल. यासाठी ६ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
यापुढे प्रकल्पांसाठी आराखडे ‘इन हाऊस’ पद्धतीने
शालान्त मंडळाच्या नूतनीकृत इमारतीचे प्रवेशद्वार तसेच गुरुकुल संकुलाची संकल्पना ही कला शिक्षकांनी तयार केली आहे. सल्लागार नियुक्त केले असते तर त्यासाठी २ टक्यांप्रमाणे शुल्क द्यावे लागले असते. यापुढे जीएसआयडीसी तसेच इतर प्रकल्पांसाठी सल्लागाराची नियुक्ती न करता ‘इन हाऊस’ पद्धतीने आराखडे तयार केले जातील.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता हेरून त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करायला हवे. सर्व जण डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकत नाहीत. काही विद्यार्थ्यांनी कौशल्यविकास विषयक शिक्षण घेतले तर त्यांना नोकरी मिळणे शक्य होणार आहे.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री