मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा : दक्षिण गोव्यातील डॉक्टर, नर्सची कमतरता भरून काढणार

मंत्रालयात आयोजित बैठकीला उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, दक्षिण गोव्यातील आमदार आणि अधिकारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ग्रामीण भागात अनेकदा वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार येत असल्याने राज्यातील रुग्णवाहिका सेवेत सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांच्या रुग्णवाहिका ‘१०८’ या आपत्कालीन सेवेशी जोडण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी येथील मंत्रालयात बुधवारी झालेल्या बैठकीत दक्षिण गोव्यातील सरकारी रुग्णालयांच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, दक्षिण गोव्यातील आमदार आणि आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राणे पत्रकारांशी बोलत होते.
बैठकीत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, काणकोण व केपे येथील रुग्णालये, तसेच फोंडा उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा आणि आवश्यक गरजांवर चर्चा झाली. आवश्यक त्या ठिकाणी डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती महिन्याभरात पूर्ण केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
रिक्त जागा महिन्याभरात भरणार : मुख्यमंत्री
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयासह काणकोण, केपे तसेच फोंडा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, याची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने महिन्याभरात रिक्त जागांसाठीची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयांतील मनुष्यबळ आणि सुविधांतील उणिवा दूर करून आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्याचा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
दर्जेदार सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध
रुग्णालयांत फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचेही बैठकीत निदर्शनास आले. या उणिवा तातडीने भरून काढून आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनतेला अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वाहने आणि आवश्यक उपकरणांचा पुरवठा