गोव्याचा पोलिसच बनला चोर; अपघातातील मृताच्या दागिन्यांवर मारला डल्ला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th February, 12:18 am
गोव्याचा पोलिसच बनला चोर; अपघातातील मृताच्या दागिन्यांवर मारला डल्ला

म्हापसा : हणजूण येथील स्वयंअपघातातील मृत झालेल्या जस्टर रॉड्रिग्ज (२७, केपे) याच्या अंगावरील ७ ते ८ लाखांचे सुवर्णलंकार चोरी केल्याच्या आरोपाखाली हणजूण पोलिसांनी पोलीस रॉबर्ट जीप चालक कॉ. साईश पार्सेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मृत जस्टर याचा भाऊ जोवी रॉड्रिग्ज याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ३०३(३) कलमान्वये हा गुन्हा नोंदवला आहे. सोन्याचे ब्रासलेट, कडा आणि एक अंगठी चोरल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

अपघात रविवार २५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ३.१५ वा. सुमारास हणजूण येथील रॉकी गॅरेजजवळ घडला होता. हडफडेहून हणजूणच्या दिशेने जात असताना जस्टरचे किया सेल्टॉस या कारवरील नियंत्रण गेल्याने गाडीची माडाला धडक बसली होती. या अपघातात गंभीर जखमी होऊन जस्टरचा म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारावेळी मृत्यू झाला होता.

अपघातानंतर फिर्यादीने आपल्या भावाच्या मोबाईलवर केलेला व्हिडिओ कॉल पोलीस रॉबर्ट जीप चालक संशयित साईश पार्सेकर याने उचलला होता. नंतर पंचनाम्यावेळी पोलिसांनी मृताच्या अंगावरील वस्तू कुटुंबियांच्या स्वाधीन केल्या होत्या. या वस्तूंमध्ये मृताच्या अंगावर असलेल्या दागिन्यांचा समावेश नव्हता.

त्यामुळे या वस्तू संशयित आरोपी कॉ. साईश पार्सेकर याने चोरल्याचा दावा करत फिर्यादीने पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीमया आधारे पोलिसांनी वरील गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा