वेरे येथील शांतादुर्गा मंदिरातील फंडपेटी फोडली

३० हजारांची रक्कम लंपास : चोर सीसीटीव्हीत कैद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th February, 11:43 pm
वेरे येथील शांतादुर्गा मंदिरातील फंडपेटी फोडली

म्हापसा : आंबेखणवाडो, वेरे बार्देश येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील फंडपेटी फोडून चोरांनी सुमारे ३० हजारांची रोख रक्कम लंपास केली. मंदिराच्या छताची कौले काढून चोरांनी ही चोरी केली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंदीस्त झाला आहे.

चोरीची घटना बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पहाटे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली होती. या प्रकरणी देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद धुंगट यांच्या तक्रारीच्या आधारे साळगाव पोलिसांनी अज्ञात चार चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मंदिराच्या आवारात राहणाऱ्या पुरोहितांनी नेहमीप्रमाणे मंदिराचा दरवाजा उघडला असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. नंतर त्यांनी देवस्थानचे पदाधिकारी व पोलिसांना घटनेची माहिती दिली.

चौघेजण मंदिराच्या प्रांगणात आले. मागील बाजूने उभारलेल्या पत्र्यांच्या शेडच्या लोखंडी खांबावरून हे चोर मंदिराच्या छतावर चढले. छपराची कौले काढून ते आतमध्ये शिरले. गर्भकुडी बाहेर असलेल्या फंडपेटीचे कुलूप त्यांनी लोखंडी हुक घालून तोडले आणि आतील सर्व रक्कम चोरून नेली. चोर शिडीचा आधार घेऊन पुन्हा आलेल्या वाटेनेच चढून पसार झाले. त्यामुळे मंदिराची इतर कोणतीही तोडफोड संशयितांकडून झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच साळगाव पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर, उपनिरीक्षक सर्वेश भंडारी, निशान नाईक यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतत पाहणी केली. पोलिसांकडून ठसे व श्वान पथकाचा वापर करण्यात आला.

फंडपेटीतून किरकोळ रक्कमच लंपास

मागील डिसेंबरमध्ये देवस्थानचा वार्षिक उत्सव झाला होता. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला देवस्थान समितीने ही फंडपेटी उघडून आतील रक्कम काढली होती. त्यामुळे चोरांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही. गेल्या महिन्याभरात भाविकांकडून फंडपेटीमध्ये घातलेली किरकोळ रक्कमच संशयित चोरांना नेता आली. 

हेही वाचा