
पणजी : केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) अधिकारी असल्याचे भासवून आणि मडगाव येथे फ्लॅट भाडेपट्टीवर घेण्याच्या बहाण्याने मालकाला ३.९५ लाख रुपयाच्या गंडा घालण्यात आला. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी थिवी येथील एड्रियान डिसोझा यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, डिसोझा यांचा मडगावात एक फ्लॅट आहे. तो भाडेपट्टीवर देण्यासाठी त्यांनी जाहिरात दिली होती. याच दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क करून आपण केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) अधिकारी असल्याचे भासवले. तसेच सदर फ्लॅट भाडेपट्टीवर पाहिजे असे सांगितले. त्यासाठी संशयिताने फ्लॅट मालकाला महिन्याची आगाऊ रक्कम आणि सुरक्षा ठेव देण्याचे ठरविले. त्यानुसार, संशयिताने वरील पैसे देण्याच्या नावाखाली तक्रारदाराच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्याच्याच बँकेतील ३.९५ लाख रुपये उडविले. त्यानंतर सदर व्यक्तीने फ्लॅट भाडेपट्टीवर घेण्याच्या बहाण्याने गंडा घातल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन कोलवाळ पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तराज राणे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.