कार झाडाला धडकली : महिलेचा पती गंभीर जखमी

जोयडा : तालुक्यातील अनमोड–हेम्मडगा रस्त्यावर पालीजवळ पुन्हा एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. मृत महिलेचे नाव जागृती हरिदास असे असून, तिच्या पतीचे नाव दत्तप्रसाद हरिदास असे आहे. हे दांपत्य गोव्यातील जुने गोवा येथे वास्तव्यास होते.
प्राप्त माहितीनुसार, गोव्यातील हे दाम्पत्य खानापूर येथे लग्नाला हजर राहून जुन्या गोव्याकडे परतत होते. पाली गावाजवळील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.
अपघातात जागृती हरिदास यांचा जागीच मृत्यू झाला, तर गाडी चालवत असलेले दत्तप्रसाद हरिदास गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मृत जागृती या खानापूरजवळील आसू गावच्या रहिवासी होत्या. त्यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी सावंतवाडी जवळील आकेरी गावातील दत्तप्रसाद यांच्याशी झाला होता. हे दाम्पत्य जुना गोवा येथे वास्तव्यास होते. या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, या परिसरातील नागरिकांनी या छोट्या मार्गावर वाढत असलेल्या अपघातांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून या रस्त्यावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सुमारे चार दिवसांपूर्वीही याच मार्गावर एका तरुणाचा अवजड वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता.