परीक्षेच्या अर्धा तास पूर्व

Story: आदित्यच्या चष्मातून | आदित्य सिनाय भा |
16th January 2022, 12:53 am
परीक्षेच्या अर्धा तास पूर्व

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात कधी न कधी परीक्षेसारख्या महाभयंकर राक्षसाचा सामना करावाच लागतो. प्रत्येक क्षणी विद्यार्थ्यांना हीच भीती वाटते की ह्या राक्षसाने त्यांना गिळून टाकले तर! परीक्षेबद्दल भीती फक्त अर्धा तास पूर्वच नव्हे तर एक दिवस आधी, एक आठवडा आधी किंवा जेव्हा टाईम टेबल येतो तेव्हापासूनसुद्धा भीती वाटायला लागते. परीक्षेच्या अगोदर आमचा मेंदू व्हायरस लागलेल्या पॅन ड्राईव्हसारखा होतो, कधीही रिकामा होऊ शकतो. देशाच्या प्रधानमंत्री किंवा संरक्षण मंत्र्यालासुद्धा जितकी देशाची चिंता नसते तेवढी चिंता विद्यार्थ्यांना होते. हॉरर फिल्म बघितल्यावरसुद्धा इतकी भीती वाटत नाही. ही भीती ३ कारणांमुळे होते –

१) अभ्यास सारखा झालेला नसल्यास व नापास झालो तर? 

२) जर डोके एकदम ब्लँक झाले तर आणि काहीच लिहिल्या विना आलो तर? 

३) सर्व येत असून जर वेळ मिळाला नाही तर?

परीक्षेच्या अगोदर मन उधाण वाऱ्याचे बनून भटकू लागते. ‘तसव्वुर के आलम में’ पोहोचते. इतक्यात विचार येतो, परीक्षा नसलेलीच तर? ह्या कल्पनेतून अचानक बाहेर येऊन आठवते की आता अर्ध्या तासानंतर परीक्षा द्यद्यची आहे व परत सर्व विद्यार्थी ख़ुफ़िया जासूसप्रमाणे पुस्तकात डोके घालतात. पण मग तेव्हाच घंटा वाजते व पश्चाताप होतो की मी थोड्या अगोदर अभ्यास केला असता तर आज ही पाळी येणार नसती. मग आम्ही मित्रांकडे जातो. कुणी किती अभ्यास केला तो पाहायला. अचानक कुणी प्रश्न विचारतो व लक्षात येते की हे मी शिकलोच नाही. थोडे विद्यार्थी छुपे रुस्तम असतात, जे सर्व काही शिकून येतात व फक्त कोण किती पाण्यात आहे हे बघायला प्रश्न विचारतात. घाई गडबडीत कधी-कधी असेही होते की परीक्षा एका विषयाची असते व आम्ही दुसऱ्याच विषयाची तयारी करून जातो. असे म्हणतात की आमचा मेंदू वर्षाचे ३६५ दिवस, दिवसाचे २४ तास चालतो पण फक्त दोन वेळा काम करायचा बंद पडतो. एक परीक्षा हॉलमध्ये व दुसरा बायको पसंद करताना. (दुसरा अनुभव मला नाही) 

आपले मन खूप चंचल असते. कधी कुठे पोहोचणार माहीत नाही. वर्गात बसून मग सुट्टीत काय करायचं ह्याची योजना करायला अर्धा वेळ जातो. कधी-कधी आम्हाला दुसऱ्यांचे जीवन सुखी वाटते. मनात विचार येतो, मी बस कंडक्टर असतो तर? परीक्षेपासून मुक्ती मिळाली असती. मग सुपरव्हायझरसाठी चहा-कॉफी, सामोसा व बटाटवडा आणला जातो, ते बघून आमच्या पोटात आणखी वेगात ‘उंदीर धावायला’ लागतात. माणसाच्या मेंदूचा रस्ता पोटातून होऊनच जातो आणि जोपर्यंत पोट-पूजा होत नाही तोपर्यंत आमचे ध्यान प्रसादरूपी सामोसावरच असते. मग वाटते काय छान आयुष्य आहे शिक्षकांचे. त्यांना परीक्षा द्यायची नाही. फक्त आरामात खात-पीत दारावर उभे राहून कुणाशी गप्पा-गोष्टी करत आमच्यावर लक्ष ठेवायचंय. पण नंतर लक्षात येते त्यांनी पण कधी आमच्याप्रमाणे परीक्षा दिलेल्याच असणार. म्हणून तर शिक्षक बनलेत व त्याकाळी अभ्यास केलाच असेल व आतासुद्धा रोज करतात. मग ह्या विचाराने उत्साह येतो की अभ्यासाची शिकार फक्त आम्हीच नाही झालो आहे, आणखी खूप पीडित आहेत. 

एखाद्या मुलीच्या प्रेमात पडूनसुद्धा जितके हृदय वेगाने धडधडत नाही, तेवढ्या जास्त वेगाने परीक्षेच्या आधी धडधडते. तेव्हा आम्ही रणनीती बनवतो, कोणता प्रश्न येणार? वर्गात एकदा शिक्षकांनी म्हटले होती की हे महत्त्वपूर्ण आहे, म्हणजे तो येणारच. जर विकल्प असेल तर आम्ही विकल्प बघतो की ह्या पैकी कुठला आम्ही छान लिहू शकतो. जेव्हा दोन्ही व्यवस्थित येत नाहीत तेव्हा लक्षात येते की नौका किनाऱ्यावर येणे कठीण आहे म्हणून. कधी-कधी टॉस करण्याचा पण विचार येतो किंवा कधी बहुविकल्पीय प्रश्नांमध्ये काही विद्यार्थी जय माता दी म्हणून किंवा १०-२०-३० असा मंत्र म्हणून काहीतरी लिहितात व ते उत्तर कधी-कधी बरोबर पण होते. नास्तिक विद्यार्थीसुद्धा परीक्षेच्या आधी आस्तिक होतो. घरातून शाळेत पोहोचेपर्यंत जितकी छोटी-मोटी मंदिरे आहेत त्या सर्वांना नमस्कार घालतात. मुख्य हेतू हा असतो की कसं-बसं पास व्हायचंच. फेल झालो किंवा आत्महत्या केली तर काय फायदा, पुढच्या जन्मात मग परत के.जी. पासून सुरू करावे लागणार ना? तेव्हा आताच काही तरी जुगाड केलेला बरा. मग मध्येच फेसबुक, व्हॉट्सऍप आठवते. परीक्षेत काय लिहिलेय हे जरी लक्षात राहत नाही पण सोशल मीडियावर केव्हा काय लिहिले होते ते सर्व आठवतेय. 

बरं आता मुख्य मुद्द्यावर येऊ. परीक्षेच्या अगोदर करावे काय? परीक्षेच्या अर्ध्या तास अगोदर वाचू नये. सर्व अभ्यास त्याच्या अगोदर पूर्ण झालाच पाहिजे. वेळेचे नियोजन तेवढेच महत्त्वाचे. आदल्या रात्री हलके जेवण घ्यावे, सकाळी लवकर उठून मोकळ्या हवेत फिरावे व थोडा व्यायाम करावा. सकारात्मक विचार मनात ठेवा. जर काही राहिलं असेल तरी सुद्धा सकारात्मक विचार करावा की ते येणार नाही, मी शिकलो आहे तेच सर्व येणार. बोर्ड परीक्षेत असे वाटते की दुसरे शिक्षक पेपर बनवतात तर त्यांची पद्धत कशी असणार. त्यासाठी आधीच काही दुसऱ्या विद्यालयाच्या पेपर पॅटर्नचे अध्ययन करावे. एकदा जर कुठलाही विचार मनात आला तर तो पूर्ण करावाच. ‘अब पछताए होत क्या, जब चिड़िया चुग गई खेत’ ही पाळी आणू नका, नियोजन करा. सोहनलाल द्विवेदींची कविता आठवा - ‘लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती।’ पण ही कोशिश परीक्षेच्या अर्धा तास पूर्व न करता रोज करायला हवी. लक्षात ठेवा ‘करत करत अभ्यास ते जड़मती होत सुजान, रसरी आवत जात ते सील पर पड़त निशान’। मंज़िलें उन्हीं को मिलती हैं, जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है। म्हणून भविष्यात हौसला बुलंद ठेवा, परीक्षेच्या भूताला दूर करा, मेहनतीने अभ्यास करा, विजय तुमचाच होणार. डर से मत डरो, उसके आगे बढ़ो क्योंकि डर के आगे जीत है।