‘चिरंजीव राहो जगी नाम रामा’

विशेषतः नाट्यसंगीत गायकीची नवी परिमाणे, नवे मापदंड निर्माण करून काळाच्या पडद्याआड गेलेल्या या महान कलाकाराच्या जाण्याने शतकोत्तर परंपरा लाभलेल्या मराठी रंगभूमीरुपी ग्रंथाचा एक सोनेरी अध्याय मागे पडला आहे.

Story: प्रासंगिक | शेखर ग. पणशीकर |
16th January 2022, 12:51 Hrs
‘चिरंजीव राहो जगी नाम रामा’

गेली कित्येक दशके मराठी संगीत रंगभूमीवर आणि नाट्यसंगीतासह विविध संगीत प्रकारांमध्ये आपल्या सुमधुर - स्वच्छ गायकीने तिन्ही सप्तकात लीलया फिरणाऱ्या आवाजाने तसेच आक्रमक तरीही अतिशय गोड दाणेदार तानांनी, सुरेल आलापांनी वातावरण भारून टाकणाऱ्या रामदास कामत नामक एका दिव्य स्वरपर्वाचा नुकताच अस्त झाला!  

बुवांना प्रत्यक्ष भेटण्याचा पहिला योग आला तो त्यांच्या एअर इंडियामधील नोकरीच्या निवृत्तीनंतरच. १९९० नंतर  'सं. ययाती आणि देवयानी' चे प्रयोग नव्याने पुन्हा सुरू करण्यात आले तेव्हाच्या कोकण दौर्‍यावेळी ययातीच्या प्रयोगानंतर थोडेसे भीतभीतच त्यांना भेटलो. त्यांच्या नाट्यगीतांबद्द्ल तसेच अन्य गीतांबद्दल ,ती फार आवडतात वगैरे संवाद साधला. तेव्हाचे त्यांचे सहजचे बोलणे, चटकन जुन्या काळातील आठवणी सांगणे यातून त्यांच्या सरळसाध्या स्वभावाचे दर्शन घडले. 

२००३ मध्ये सावंतवाडी येथे आम्ही आमच्या 'नादब्रम्ह' या सांगीतिक परिवारातर्फे पहिल्या समारोहाचे आयोजन केले. त्या काळात गोव्यात ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीताला लोक गर्दी करत त्या तुलनेत सिंधुदुर्गात लोक जमतीलच याची शाश्वती वाटत नव्हती. त्यामुळे शास्त्रीय संगीतासोबत नाट्यसंगीताच्या मैफिली ठेवल्यास चांगला प्रतिसाद मिळेल हे लक्षात घेऊन पं. रामदास कामत, पं. शरद जांभेकर आणि गंधर्व गायकीचे वारसदार पं. लालजी देसाई यांच्या स्वतंत्र मैफली ठेवल्या. अर्थात गर्दी जमविण्यामागे अर्थकारण नव्हते. समारोह रसिकांसाठी विनामूल्यच होता. 

रामदास कामतांच्या मैफलीने सुरुवात होणार होती आणि प्रेक्षागार अक्षरश: तोबा गर्दीने भरून ओसंडून गेले. बुवांनी श्रोत्यांशी संवाद साधत मैफिलीचा ताबा घेतला. संगीत समारोहाचे औचित्य साधून ते म्हणाले, '' ही संध्याकाळची वेळ 'यमन' रागाची आहे. मराठी रंगभूमीवर आजवर तीन यमन गाजले. पहिला यमन 'स्वयंवर' मधला ' नाथ हा माझा', दूसरा रांगणेकरांच्या ' कुलवधू' मधला ' दे मज देवा जन्म हा' या गीतातला आणि तिसरा ' मत्स्यगंधा'तील 'देवाघरचे ज्ञात कुणाला' चा. " आणि बुवांनी ही तीनही यमन गीते गाऊन रसिकमन जिंकले. ऑर्गनवर मकरंद कुंडले, तर तबला व संवादिनी अनुक्रमाने दयेश कोसंबे व राया कोरगावकर या गोमंतकिय जोडगोळीनेही रसिकांच्या टाळ्या घेतल्या, त्यामागे बुवांनी त्यांना त्यांचे कौशल्य प्रकट करायला मुक्तपणे वाव देऊन मैफल कशी जमवायची असते कशी रंगवायची असते याचेच प्रत्यंतर आणून दिले.

या समारोहाकरिता आम्ही एक अभिनव कल्पना राबविली. हे मुंबईकर कलाकार सकाळच्या ट्रेन ने उतरायचे होते.स्थानिक  स्टाफ व स्टेशनमास्टर परिचयाचे व असल्याने आम्ही विनंती केली की , हे कलाकार स्टेशनवर उतरले की त्यांच्या प्रत्येकाच्या नावानिशी स्वागताची घोषणा तिथल्या ध्वनिव्यवस्थेतून व्हावी स्टेशनमास्टर व सहकारी हे संगीतप्रेमी असल्याने त्यांना ही सूचना आवडली व त्यांनी प्रत्येकाचे नाव घेऊन स्वागताची घोषणा ऐकवली ! त्या मैफलीत आठवणीने बुवांनी या अभिनव कल्पनेबद्दल आभार तर मानलेच, व हा असा रेल्वे व्यवस्थापनाने वैयक्तीक स्वागताची घोषणा करण्याचा व ती ऐकण्याचा जीवनातला पहिला प्रसंग होता हे सांगताना त्यांचे डोळे भरून आले होते !!

सिंधुदुर्गातील आरवली हे माझे मूळ गाव. या गावातले श्री वेतोबाचे मंदिर फार प्रसिद्ध आहे, त्यावर्षी देवाच्या वर्धापनदिनानिमित्ताने २००७ साली बुवांची मैफल करण्याचे ठरले, २००३ च्या, सावंतवाडी येथील मैफलीचा दुवा पकडून त्यांच्याशी बोलणे झाले. बुवांनी लगेच हो म्हटले. ज्येष्ठ ऑर्गनवादक पं. तुळशीदास बोरकर, आणि प्रसिद्ध तबलावादक साई बँकर तर हार्मोनियमवर नादब्रह्मचे सतीश शेजवलकर आदी ठरले. माझ्या सुदैवाने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे, बुवांना स्टेशनवरून घेऊन निवास व्यवस्थेच्या ठिकाणी नेण्यापासून कार्यक्रमात बुवांचा परिचय व निवेदन करण्याची संधी मला मिळाली. उत्सवात पालखी वगैरे असल्याने  नियोजित वेळेहून कार्यक्रम तासभर उशिराने सुरू झाला. तरीही बुवांसाठी रसिकमंडळी तिष्ठत थांबली होती व मला एक शाब्दिक कोटी करण्याची उर्मी आली. मी पटकन बोललो, की "दास रामाचा वाट पाहे सदना " असे आपण नेहमीच म्हणतो किंवा रामदासांनी स्वतः गणपतीकरिता लिहिले. पण आज इथे नेमके उलटे झाले आहे ! आम्ही सारे या वेतोबाच्या सदनात या रामदासांची वाट पहात  आहोत ! या वाक्यावर रसिकांनी टाळ्या वाजविल्या खऱ्या, पण माझे लक्ष बुवांकडे होते, मी 'दास रामाचा' उल्लेख केला तेव्हा बुवांनी किंचित रोखून माझ्याकडे पाहिले होते, काहीतरी नको तो विनोद होतोय का असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता, पण माझ्या दुसऱ्या वाक्याला त्यांनी मनमुराद  दाद दिली होती ! 

कार्यक्रम संपल्यावर ते मला म्हणाले, की मी सुरूवातीला खरेच घाबरलो होतो. 

मला काही निवेदक मंडळींची भीती वाटते, कधी कधी काहीही बोलतात, असे सांगून ते मला म्हणाले, की त्यांनी केलेल्या पराशरच्या भूमिकेच्या काळात सहा वेगवेगळ्या नायिका अर्थात एकूण सहा मत्स्यगंधा त्यांच्या समवेत भूमिका केली, त्यावरून  मराठीतील एका ज्येष्ठ कलाकार - साहित्यिकाने बुवांच्या कार्यक्रमात निवेदन करताना काहीतरी चावट विनोद केला आणि आपण तिडकीने तिथून उठून थेट विंगेत गेलो व त्यांची कडक शब्दात हजेरी घेऊन आपली माफी मागायला लावली व प्रेक्षकांसमोरही झालेल्या चूकीबद्दल दिलगिरी व्यक्त करायला लावल्याचे बुवा म्हणाले.

त्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बुवांना निरोप द्यायला पुन्हा स्टेशनपर्यंत गेलो असता, बुवा म्हणाले की आपण सूत्रसंचालन वगैरे करता, तेव्हा आपल्या पाहण्यात मी दिवाळी अंक १९८१ त लिहिलेला" एक लेख तुम्हाला कुठेही सापडला तर  मला हवाय. मी लगेच त्यांना लेखाचे शीर्षक ऐकवले त्यांना फार आनंद झाला, मी तो लेख वाचला होता असे सांगितले तेव्हा त्यांना फार बरे वाटले. शेवटी सुमारे सहा सात महिन्यात मी तो लेख शोधून काढून त्याची कॉपी त्यांना पाठविली, काही दिवसात त्यांचे आभाराचे पत्रही आले. त्यांचे ते पत्र व त्यापूर्वीचे एक पत्र अशी दोन्ही पत्रे माझ्या संग्रहात आजही आहेत !!त्यांच्या मृदू व प्रेमळ स्वभावाचे दर्शन घडविणारी ही पत्रे आहेत !

गोमंतकीय लोकांना बा. भ. बोरकरांनी एका लेखात काश्मीरमधील चिनार वृक्षाची उपमा दिली आहे, ते म्हणतात, की चिनार हा वृक्ष काश्मीरमध्ये जेवढा वाढतो बहरतो तेवढा अन्य कुठेही लावला तरी बहरत नाही गोव्यातील माणूस जगात कुठेही गेला तरी मनाने गोव्यात राहतो गोव्याच्या आठवणीत झुरतो रमतो आणि गोव्याशी जोडलेलाच राहतो. बुवांनी एअर इंडियात अधिकारी म्हणून नोकरी केली, त्यात त्यांना काही काळ आखाती देशात रहावे लागले, पण तिथेही अधेमधे त्यांच्या मैफली होत असत. तिथली महाराष्ट्रीय तसेच गोमंतकीय मंडळी त्यांच्या मैफली आयोजित करत असत ! 

वर उल्लेख केल्याप्रमाणे  गोव्यातील एका सुप्रसिद्ध दैनिकाच्या दिवाळी अंकात "गोव्यापासुनी दूर मनीं हुरहूर" या सदरात >> पान ४ वर

बुवांचा एक लेख माझ्या वाचनात आला होता. वर्ष होते १९८१. बुवांनी गोव्यातल्या लहानपणापासूनच्या अनेक आठवणी त्यात तर सांगितल्या होत्याच . पण सं. मत्स्यगंधात महर्षी पराशरच्या भूमिकेत गात असताना एकदा बुवांची नकली दाढी सुटून पडली बुवांनी पटकन ती लावली सुद्धा , परंतू एकही शिट्टी टाळी हशा आला नाही याचे कारण बुवांनी लिहिले ते म्हणजे "आमचो रामदास" ही प्रेक्षकांची आपुलकीची भावना , गोव्यात कुठेही नाटक असले की कुणीतरी साखळी गावची माहेरवाशीण येऊन जुनी ओळख सांगून घरी नेऊन आगत स्वागत करत असे , हे त्यांनी त्या लेखात आवर्जून लिहून गोव्यापासून दूर राहताना गोवा कसा आठवत रहातो हे तळमळीने सांगितले होते !! 

बुवांच्या कलाप्रवासाचा आढावा घ्यायचा झाल्यास

त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे वडील बंधू उपेंद्र कामत गोविंदराव अग्नी आणि अभिषेकीबुवांकडून संगीताचे मौलिक असे धडे त्यांना गिरवायला मिळाले. नाट्यअभिनयासाठी  गोपीनाथ सावकारांनी मार्गदर्शन केले सं. मत्स्यगंधा नंतर "ययाती आणि देवयानी", "मीरा मधुरा", "हे बंध रेशमाचे" इत्यादी नाटकातून प्रमुख भूमिका करत संगीतकार अभिषेकी बुवा आणि गायक रामदास कामत ही जोडी अनेक वर्षांपर्यंत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली. "मदनाची मंजिरी", "होनाजी बाळा" या विद्याधर गोखले, पं. राम मराठे, वसंत देसाई यांच्या संगीत दिग्दर्शनात केलेल्या भूमिका व नाट्यगीतेही गाजली. "आली प्रणयचंद्रिका" असो वा "श्रीरंगा कमलाकांता" किंवा "विश्वनाट्यसूत्रधार तूच श्यामसुंदरा ही 'शाबास बिरबल'ची नांदी असो, त्यांचे नाव घेतल्याशिवाय या संगीत नाटकांची आणि गीतांची कहाणी सुफळ संपूर्ण होणार नाही.

"त्या क्रूर लाल ज्वाळा आवर्त त्यात सुटले" (गीत- गुरुनाथ शेणई, संगीत भानुकांत लुकतुके) "ना साहवे विराणी"  यासारख्या आर्ततापूर्ण गीतात कामतांचा पहाडी आवाज रचनेतले कारुण्यही तेवढेच उत्कटतेने टिपतो. त्यांनी त्यांची मातृभाषा कोंकणीतही काही गीते गायलीत त्यांच्या ध्वनिमुद्रिकाही ऐकायला मिळतात. आकाशवाणी मुंबई निर्मित 'बिल्हण' या संगीतिकेतील "माझे जीवन गाणे" आणि "शब्दांच्या पलिकडले" ही पाडगावकरांची  पु. ल. देशपांडे यांनी संगीत दिलेली गीते अभिषेकीबुवांच्या आवाजात लोकप्रिय झाली असली, तरी कामत प्रत्यक्ष एका मैफलीत म्हणाले होते की, ही दोन्ही पदे त्या संगीतिकेत आपण गायली होती परंतु अभिषेकीबुवांना ती अतिशय आवडल्याने त्यांनी ती आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित केली हे विशेष.

गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत 'रंगशारदा मुंबई' या संस्थेतून नव्या पिढीला नाट्यसंगीत व संगीत नाटक विषयक शिक्षण देण्याचे काम आपले वय विसरून त्यांनी सुरू ठेवले होते.

कामतांच्या आठवणींचा मागोवा घेताना त्यांचा साधेपणा, आनंदी वृत्ती, विनम्रता तेवढाच स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा, मिश्किल वृत्ती, तेवढाच हळवेपणा किंवा भावनाप्रधानताही लक्षणीय होती. सिंधुदुर्गातील कुडाळ येथे होनाजी बाळा या नाटकाच्या मध्यंतरात स्थानिक नाट्यकर्मी असलेल्या वर्दम कुटुंबीयांतील वयाची शंभरी गाठलेल्या ज्येष्ठ नाट्यप्रेमीकडून सत्कार - सन्मान स्वीकारताना ते एवढे हळवे झाले होते की  त्यांना अक्षरशः अश्रू अनावर होऊन एक शब्दही बोलता येईना. वास्तविक, जीवनात उत्तम शिक्षण तसेच मानाच्या अधिकाराच्या पदांवर काम करून विविध मान सन्मान मिळवून कलाक्षेत्रातही दबदबा निर्माण केलेल्या व्यक्ती एवढ्या भावनाशील असतातच असे नाही. परंतु खरोखरीच अतिशय संवेदनशील कलाकार व माणूस म्हणूनही आदर्श आणि कृतार्थ जीवन जगलेल्या या रंगदेवतेच्या  सेवकाला विनम्र अभिवादन !!!

 "चिरंजीव राहो

जगी नाम रामा

जोवरी रवी शशी

पाव सुखधामा"