वारसा आणि वसा

गोव्यात उत्पल हे एकटे नाहीत. अशी वारसा पुढे नेऊ पाहणारी अनेक कुटुंबे गोव्यात आहेत. सत्तरीत राणे, डिचोलीत झांट्ये, शेट, बार्देशमध्ये डिसोझा, लोबो, कांदोळकर, तिसवाडीत पर्रीकर, मोन्सेरात, नाईक, मडकईकर आणि फर्नांडिस, सांगे-केपेत कवळेकर, फोंड्यात नाईक, ढवळीकर, सासष्टीत आलेमाव, सार्दिन, मुरगावात साल्ढाणा कुटुंब आपला राजकीय वारसा पुढे जावा यासाठी प्रयत्न करत आहेत. काही कुटुंबे पूर्णपणे राजकारणातून बाहेर पडलेली आहेत. काहींचा पुन्हा प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहे.

Story: उतारा । पांडुरंग गांवकर । ९७६३१०६३०० |
16th January 2022, 12:43 am
वारसा आणि वसा

२१ जानेवारीपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात होत आहे. १४ फेब्रुवारीला मतदान होईल. चाळीस मतदारसंघांतील बहुतांशी ठिकाणी यावेळी प्रथमच चार ते पाच महत्त्वाच्या पक्षांचे उमेदवार असतील. त्यामुळे गोव्यातील निवडणुकीत किमान २०० उमेदवार निश्चित आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही असे अनेक नवे चेहरे यावेळी निवडणुकीत उतरले आहेत. तर काहीजण आपल्या पूर्वापार चालत आलेल्या राजकीय वारशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील. चाळीस मतदारसंघांच्या गोवा विधानसभेत सात ते आठ कुटुंबांना आपला राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी धडपड करावी लागत आहे. मतदारांना ग्राह्य धरून अनेक वर्षे त्यांच्यावर आपल्याला हवे ते लादणारे काही राजकारणी आणि त्यांच्या कुटुंबांना गोव्यातील राजकीय व्यवस्था आपले खासगी संस्थान करायची इच्छा असते. वडिलांनंतर मुलगा किंवा मुलगी, पती नंतर पत्नी किंवा मुले, एका भावानंतर दुसरा भाऊ अशा पद्धतीने अनेक कुटुंबे आपला राजकीय वारसा पुढे जावा म्हणून घाम गाळत आहेत.

आपण वगळून कोणी मुख्यमंत्री झालेला त्यांना पाहवत नाही. आपण बाहेर आणि एखादा मागास भागातून पुढे आलेला नेता मंत्री व्हावा हेही पाहवत नाही. गिरीश चोडणकर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले हे अजूनही अनेकांना पचत नाही. मनोज परब स्थानिक पक्ष स्थापन करतो तर त्याची चेष्ठा केली जाते. राहुल म्हांबरे ‘आप’चे राज्य प्रमुख झाले तर आश्चर्य वाटते, आलेक्स रेजिनाल्डला वेळोवेळी चांगल्या संधीपासून दूर ठेवले गेले. हे लोक मोठे होतात याचा अर्थ राजकारणाचा धंदा थाटून बसलेल्या अनेकांना धोका ठरतो. ज्यांनी आपल्या मुलांना, पत्नीला, भावांना राजकारणात आणून त्यांचे राजकीय भवितव्य घडविण्यासाठी विडा उचलला आहे अशा लोकांना नव्या, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांनी राजकारणात येणे म्हणजे घृणा वाटते. त्यांचे येणे किळसवाणे वाटते. अनेकजण तर आपल्याला अमूक लोकांचा ‘फोबिया’ आहे असे बोलूनही दाखवतात. त्यांना भीती असते की कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेले लोक राजकारणात आल्यानंतर आपला धंदा बंद होईल. ही अकारण वाटणारी भीतीही असते आणि अकारण वाटणारा तिरस्कारही. वर्षानुवर्षे लोकांच्या जीवावर विधानसभेत जाणाऱ्यांविषयी लोकांच्या मनात ‘फोबिया’ निर्माण होत नाही तोपर्यंत बाप-मुलगा-मुलगी-पत्नी-भाऊ असे नातेसंबंध विधानसभेत येत राहतील.

पणजीत सध्या उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्यावरून वाद सुरू आहे. एकेकाळी सिद्धार्थ कुंकळ्येकर ज्यांना हवे होते त्यांनी आता उत्पलची तळी उचलून धरली आहे. ज्यांची मागणी आहे ते, इतर ठिकाणचा न्याय पणजीत का नाही असा वाद घालतात. पण भाजपच्या मंडळातील किंवा इतकी वर्षे पणजीत पक्षाचे काम केलेल्या दुसऱ्या एखाद्या उमद्या तरुणाला उमेदवारी देऊया यावर त्यांचे एकमत नाही. गोव्यात उत्पल हे एकटे नाहीत. अशी वारसा पुढे नेऊ पाहणारी अनेक कुटुंबे गोव्यात आहेत. सत्तरीत राणे, डिचोलीत झांट्ये, शेट, बार्देशमध्ये डिसोझा, लोबो, कांदोळकर, तिसवाडीत पर्रीकर, मोन्सेरात, नाईक, मडकईकर आणि फर्नांडिस, सांगे-केपेत कवळेकर, फोंड्यात नाईक, ढवळीकर, सासष्टीत आलेमाव, सार्दिन, मुरगावात साल्ढाणा कुटुंब आपला राजकीय वारसा पुढे जावा यासाठी प्रयत्न करत आहेत. काही कुटुंबे पूर्णपणे राजकारणातून बाहेर पडलेली आहेत. काहींचा पुन्हा प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहे. पेडणे तालुक्यात परब कुटुंब असेल किंवा मुरगावमध्ये वाझ कुटुंब असेल. तिसवाडीत वाघ कुटुंब असेल. सर्वांनाच आपल्या कुटुंबातील राजकीय वारसा पुढे जावा असे वाटते. राजकारण हे व्यसन होत आहे.

एखाद्याची पात्रता असेल, समाजाची सेवा करण्याची तळमळ असेल तर त्यांनी आवश्य राजकारणात यावे. पण जे साडेचार वर्षे मतदारसंघात फिरकत नाहीत आणि शेवटच्या सहा महिन्यांत मतदारसंघात मतांसाठी फिरतात, ज्यांनी आपला मतदारसंघही महिनोमहिने पाहिलेला नसतो अशा लोकांना गोव्यातील लोक निवडून देतात. पात्रता असेल तर आमदार, खासदाराच्या कुटुंबातील कोणीही निवडणुकीत उतरावे. पण समाजात इतरही लोक आहेत त्यांनी राजकारणात का उतरू नये? मंत्री, आमदारांचीच मुले एखादी पदवी घेऊन आले म्हणजे पात्र ठरतात? मतदारसंघातील इतर सुशिक्षित लोक पात्र नाहीत का? त्यांना अधिकार नाही का? की फक्त आजी माजी मंत्री, आमदार, खासदाराच्या पत्नीने, मुलाने, सुनेने, मुलीने, भावानेच आमदार व्हावे? आमदार होण्यासाठी हीच पात्रता आहे का? मतदार स्वतःहून आत्मपरीक्षण कधी करतील? कितीतरी मतदारसंघांतील लोक आजही एखाद्याच्या नावाने दगड ठेवला तर त्यालाही मते देतील अशी स्थिती आहे. मतदारांच्या या चुकांमुळेच उठसूठ लोक वारसा जपण्यासाठी आजी-माजी आमदारांच्या वारसदारांना पुढे करतात.

सुरुवातीच्या काळात भाजपा मोठ्या प्रमाणात साध्या कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी उमेदवारी द्यायचा. कालांतराने भाजपने आपली ध्येयधोरणे बदलली. मागच्या निवडणुकीत गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्षाने नवे उमदे चेहरे हेरले होते. यावेळी आम आदमी पार्टी, रिव्होल्युशनरी गोवन्ससारखे राजकीय पक्ष नव्या, तरुण, सुशिक्षित आणि सामाजिक कार्यात सहभागी असलेल्यांना उमेदवारी देत आहे. राजकीय नेत्यांचे वारसे जपण्याला महत्त्व देण्यापेक्षा आणि जाहीरपणे गुलामगिरी स्वीकारण्यापेक्षा पक्षासाठी, समाजासाठी सतत कार्यरत असलेल्या चांगल्या कार्यकर्त्यांना तसेच सामाजिक बांधिलकीचा वसा जपणाऱ्यांना उमेदवारी देण्यासाठी राजकीय पक्षांवर दबाव आणायला हवा. कार्यकर्ते, मतदारांनी फक्त मत देण्यापेक्षा आणि पक्षाचे झेंडे घेऊन फिरण्यापेक्षा आपल्याला हवा असलेला उमेदवार द्या यासाठीही आग्रही असणे गरजेचे आहे. हे आग्रही असणे म्हणजे आजी-माजी आमदारांच्या घरच्यांनाच उमेदवारी द्या म्हणून तगादा लावणे नव्हे.