
पणजी: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी आणखी दोन उमेदवारांची घोषणा करत सर्व ४० उमेदवारांची यादी पूर्ण केली आहे. पक्ष एकूण ४० जागांवर निवडणूक लढवत आहे, त्यापैकी ३ जागा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासाठी सोडल्या असून, उर्वरित ७ जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. तसेच, येत्या दोन दिवसांत जिल्हा पंचायतीसाठी पक्षाचा जाहीरनामा देखील प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
जिल्हा पंचायत निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक तारीख निश्चित असतानाही, आचारसंहिता २९ नोव्हेंबर रोजी जाहीर झाली. सर्वात आधी आम आदमी पक्षाने उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली होती. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सलग चार याद्यांमध्ये आपले ४० उमेदवार जाहीर केले.
अखेरची यादी जाहीर
गुरुवारी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या शेवटच्या यादीत दोन नावांचा समावेश आहे. दवर्ली मतदारसंघातून सत्यविजय नाईक (ओबीसी) आणि नावेली मतदारसंघातून लक्ष्मी बाबुराव शेटकार (महिला ओबीसी) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
अध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले की, भाजपने सर्व उमेदवारांची घोषणा केली असून, सगळ्या उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. मगोसाठी सोडलेल्या तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्याची जबाबदारी मगोची आहे. तर उर्वरित सात मतदारसंघांत भाजप अपक्ष उमेदवारांना सक्रियपणे पाठिंबा देणार आहे. एकंदरीत चित्र पाहिल्यास भाजपने ४०, आपने २९, काँग्रेसने ११ तर आरजीने १२ उमेदवारांची घोषणा केली आहे.