जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान २३७ जणांना लागण

पणजी: गोव्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत एकूण एचआयव्ही बाधितांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीयरीत्या अधिक असल्याचे समोर आले आहे. या कालावधीत राज्यात एकूण २३७ जणांना एचआयव्हीची लागण झाली. यामध्ये ९ गरोदर महिला वगळता २२८ बाधितांमध्ये १७३ पुरुष, ५४ महिला आणि एक तृतीयपंथी व्यक्तीचा समावेश आहे.
राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण चिंताजनक आहे. २२८ बाधितांपैकी २१ (९.२ टक्के) बाधित १५ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत, तर ८४ बाधित (३६.८ टक्के) २५ ते ३४ वर्षे या वयोगटातील आहेत.
इतर वयोगटांचा विचार केल्यास, पहिल्या दहा महिन्यांत एकूण बाधितांपैकी ७९ (३४.६ टक्के) हे ३५ ते ४९ वर्षे वयोगटातील आहेत, तर १४ वर्षांखालील केवळ २ बाधित (१.२ टक्के) आढळले आहेत. एकूण ४२ बाधितांचे वय (१८.४ टक्के) ५० किंवा त्याहून अधिक आहे. याच कालावधीत आरोग्य खात्याने १.२६ लाख जणांची चाचणी केली. एचआयव्ही पॉझिटिव्हिटी दर ०.१९ टक्के इतका कमी होता. या दरम्यान राज्यात एड्स झालेले ७ रुग्ण आढळले, ज्यामध्ये ५ पुरुष आणि २ महिला आहेत.
एड्स नियंत्रणात गोवा देशात चौथा
संस्थेतर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात या क्षेत्रात चांगले काम केलेल्या आरोग्य केंद्रे आणि स्वयंसेवी संस्थांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात आरोग्य सचिव यतींद्र मराळकर, डॉ. वंदना धुमे आणि अन्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
डॉ. वंदना धुमे यांनी सांगितले की, गोवा एड्स नियंत्रण संस्थेने मागील काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. यामुळेच २०२४-२५ मध्ये संस्थेला एचआयव्ही नियंत्रणात देशात चौथा क्रमांक मिळाला आहे. एचआयव्ही नियंत्रण करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य सचिव मराळकर यांनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील एड्स नियंत्रणात असल्याचे सांगितले. एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये १७७ 'रेड रिबन क्लब' सुरू केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.