झेडपी निवडणूक : युतीच्या चर्चेदरम्यान आरजीपीची पहिली यादी जारी

उत्तर गोव्यात ७ तर दक्षिण गोव्यात ५ उमेदवार जाहीर

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
just now
झेडपी निवडणूक : युतीच्या चर्चेदरम्यान आरजीपीची पहिली यादी जारी

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. या यादीत एकूण १२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. आरजीने उत्तर गोव्यात सात आणि दक्षिण गोव्यात पाच उमेदवार जाहीर केले आहेत. विरोधी पक्षांमध्ये युतीबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि गोंधळादरम्यान ही यादी आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आरजीपीचे उमेदवार पुढील प्रमाणे : 

उत्तर गोव्याच्या तोरसे मतदारसंघातून नारायण शिरोडकर, कोलवाळ मतदारसंघातून प्रज्ञा सावंत, शिरसई मतदारसंघातून सिप्रीयान परेरा, शिवोली मतदारसंघातून जयनाथ पाडोलकर, हणजूण मतदारसंघातून मिगेल क्वेरोझ, सांताक्रुझ मतदारसंघातून एस्प्रेन्सा ब्रागांझा आणि सेंट लोरेन्स मतदारसंघातून तृप्ती बकाल यांना पक्षाची उमेदवारी मिळाली आहे.

दक्षिण गोव्यामध्ये वेलिंग-प्रियोळ मतदारसंघातून निता जल्मी, बेतकी-खांडोळा मतदारसंघातून विनय गावडे, केवला मतदारसंघातून विश्वेश नाईक, बोरी मतदारसंघातून हर्षा बोरकर आणि शिरोडा मतदारसंघातून दिपीनीती शिरोडकर यांना पक्षाची उमेदवारी मिळाली आहे.

युतीबाबत अजूनही सकारात्मकता कायम? 

दरम्यान, काँग्रेस, आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड या तिन्ही पक्षांमध्ये युतीबाबतची चर्चा अजूनही चालू आहे, मात्र कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने आपली पहिली उमेदवारांची यादी जारी केल्यामुळे आरजीपीला धक्का बसला होता. त्यांनी काँग्रेसवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता आणि आज गुरुवारी युतीबद्दलचा अंतिम निर्णय कळवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, आज आरजीपीने उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने यापूर्वी उमेदवार जाहीर केलेले मतदारसंघ आरजीने जाणीवपूर्वक वगळले आहेत. त्यामुळे युतीबाबत

सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दुसऱ्या बाजूला, गोवा फॉरवर्डने शिरोडा मतदारसंघात आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, तर आरजीपीने याच शिरोडा मतदारसंघात गोवा फॉरवर्डच्या संभाव्य उमेदवार काजल गावकर यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. या निवडणुकीत फक्त काँग्रेस आणि आरजीपीने उमेदवार जाहीर केले आहेत, तर गोवा फॉरवर्ड आपले उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. 


हेही वाचा