उचलला सर्व खर्च; चेन्नई येथे उपचार सुरू

पणजी: कासारवर्णे, पेडणे येथील आणि गोवा अग्निशमन दलाचे कर्मचारी उमेश वरक एका दुर्धर आजाराने ग्रस्त असून त्यांना हृदय प्रत्यारोपणाची गरज होती. त्यांच्या उपचारासाठी येणारा सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचा मोठा खर्च येणार होता. यासाठी वरक यांच्या कुटुंबीयांनी मदतीची मागणी केली होती.
आता मांद्रे आमदार जीत आरोलकर त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले असून त्यांनी उपचारांचा पूर्ण भार उचलला आहे. सध्या वरक यांच्यावर चेन्नई येथे उपचार सुरू आहेत. आमदार आरोलकर यांनी रुग्णालयात भेट देऊन उमेश वरक यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
हृदय प्रत्यारोपणाची तातडीची गरज
माहितीनुसार, कासारवर्णे ग्रामपंचायत क्षेत्रातील मोपा पठारावरील रहिवासी असलेले उमेश वरक हे गंभीर हृदयविकाराने त्रस्त होते. दोन वर्षांपूर्वीच ते गोवा अग्निशमन दलात वाहन चालक म्हणून रुजू झाले होते. हृदय प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याने त्यांना मुंबईतील मुलुंड गोरेगाव येथील फोर्टिस या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी सुमारे ३५ ते ४० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. वरक यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या कुटुंबाला एवढा मोठा खर्च करणे शक्य नव्हते. त्यामुळे वरक कुटुंबाने गोमंतकीय जनतेला आर्थिक मदतीची आर्त हाक दिली होती, तसेच दात्यांनी मदतीचा हात देऊन उमेशला संजीवनी प्राप्त करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

आमदारांचा त्वरित मदतीचा निर्णय
वरक कुटुंबीयांची गंभीर आर्थिक परिस्थिती आणि उमेश यांची उपचाराची तातडीची गरज लक्षात घेऊन मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी संपूर्ण उपचाराचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या मोठ्या आर्थिक मदतीमुळे उमेश वरक यांच्यावर आता चेन्नई येथील रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झाले आहेत.

आमदार आरोलकर यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच आवश्यक ती सर्व मदत वेळेवर पोहोचेल याची खात्री केली. आमदारांच्या या त्वरित आणि निर्णायक मदतीमुळे वरक कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.