ज्वारीचा केक

लहानांपासून मोठे सर्वच आवडीने आणि चवीने खातील असा पौष्टिक ज्वारीचा केक.

Story: अन्नपूर्णा । शीतल लावणीस |
14th January 2022, 11:23 Hrs
ज्वारीचा केक

ज्वारीचा केक कधी खाल्ला का? आता अगोदर ही रेसिपी वाचा, केक करून पहा. व खाऊन बघा. नक्की आवडेल तुम्हाला. अगदी साधा व सोपा आहे. चला तर मग करूया सुरुवात. केक, पिझ्झा, बिस्कीटं मैद्यापासून बनवली  जातात. मैदा आरोग्याला किती वाईट हे थोड्याच लोकांना माहीत. मैद्याला 'मंद विष' असे म्हटले आहे. मैद्याला पर्याय आहेत आणि ते म्हणजे  गहू, नाचणी, जोंधळा ह्यांची पीठे. हया पीठापासून आपण मैद्याइतकेच चविष्ट केक बनवू शकतो.

ज्वारीचे अनेक फायदे असतात. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमीनो  ऍसिडसमधून शरीराला मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच त्यात फायबर्स असल्याने सहज पचन होते. आता पाहूया ज्वारीच्या केकचे साहित्य आणि कृती.

साहित्य:

एक कप ज्वारी पीठ

एक कप पिठी साखर.

अर्धा कप दही

४ टेबलस्पून कोको पावडर.   

अर्धा कप दूध.

चार टेबलस्पून वितळलेले  लोणी.

एक टेबलस्पून बेकिंग  पावडर.

अर्धा चमचा वॅनिला इसेन्स.

कृती: 

ज्वारी पीठ, कोको पावडर, बेकिंग पावडर एकत्र करून तीन - चार वेळा चाळणीने चाळून घ्या.दुसऱ्या बाऊलमध्ये दूध, दही, साखर व लोणी एकत्र करून फेसा. व त्यात आता ज्वारीचे चाळलेले मिश्रण बाऊलमध्ये  घाला एकाच दिशेने  चमचा फिरवा. हे केक मिश्रण तूप /तेल लावलेल्या केक पात्रात ओता. हे पात्र प्री हिट केलेल्या ओव्हनमध्ये ठेवा. ३५ ते ४० मिनिटे १८० डिग्री सेण्टिग्रेड तापमानावर  केक भाजल्याची  टूथपिक टोचून खात्री करून घ्या. टूथपिक कोरडी निघाल्यास केक भाजला असे समजावे. नसल्यास आणखीन थोडा वेळ भाजावे.