कोलव्यातील धिरयो : कायद्याची पायमल्ली

Story: अंतरंग - दक्षिण गोवा |
5 hours ago
कोलव्यातील धिरयो : कायद्याची पायमल्ली

कोलवा परिसरात डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या प्रारंभी दोन धिरयोंचे आयोजन झाले होते. पोलिसांनी नेहमीप्रमाणे उशिराने अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला. जिल्हाधिकार्यांनी स्थापन केलेली समितीही कुचकामी ठरत आहे. त्यामुळे प्राण्यांवरील क्रूरता, त्याची मजा घेणाऱ्यांची वाढती संख्या व कायद्याची पायमल्ली हे डोळ्यासमोर असतानाही प्रशासन केवळ कारवाईचा फार्स दाखवून वेळ मारुन नेत आहे. 

गोव्याची आदरातिथ्याची संस्कृती जगभर प्रसिद्ध आहे, त्यामुळेच दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येत असतात. मात्र अशा काही पारंपरिक खेळाच्या नावाखाली काही ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करणारे प्रकार घडताना दिसतात. दक्षिण गोव्यातील सासष्टी व किनारी भाग हा सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जाताे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कोलवा, सुरावली, बाणावली आणि आसपासच्या परिसरात बेकायदेशीर बैलांच्या रेड्यांच्या झुंजींचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जात आहे. या धिरयो पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांचीही गर्दी होते. 

सर्वोच्च न्यायालयाकडून देशातील प्राण्यांच्या झुंजींवर बंदी घातली आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांतर्गत धिरयो आयोजन करणे हा एक दखलपात्र गुन्हा आहे. असे असतानाही कोलव्यासारख्या पर्यटनस्थळी पहाटे व सायंकाळच्या वेळी किंवा निर्जन ठिकाणी, शेतजमिनीत शेकडो लोकांच्या उपस्थितीत या झुंजी लावल्या जातात. यात लाखो रुपयांची सट्टेबाजी चालते. हा प्रश्न केवळ प्राण्यांच्या छळापुरता मर्यादित न राहता एका मोठ्या गुन्हेगारी स्वरूपाचा बनला आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात खेदजनक बाब म्हणजे पोलिसांची डोळ्यावर व कानावर हात ठेवण्याची भूमिका होय. कोलव्यातील स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, धिरयोचे आयोजन करण्यापूर्वी त्याची माहिती समाजमाध्यमांवरून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये किंवा गुप्तपणे पसरवली जाते. तरीही पोलिसांना याबद्दल आगाऊ माहिती मिळत नाही, हे समजण्यापलिकडील आहे. अनेक वेळा झुंजी सुरू असताना पोलीस घटनास्थळी पोहोचत नाहीत आणि पोहोचले तरी झुंज लावणारे पळून गेल्याचे कारण दिले जाते. कारवाईच्या नावाखाली अज्ञातांविरोधात गुन्हे नोंद केले जातात. त्यानंतर पुढील झुंजीपर्यंत त्या प्रकरणात कोणतीही कारवाई न होता तपास सुरू असल्याची कारणे दिली जातात. 

अनेकदा स्थानिक राजकारण्यांच्या वरदहस्तामुळे पोलीस आयोजकांवर कारवाई करण्यास तयार नसतात. पोलीस आणि आयोजक यांच्यातील लागेबांधे असल्याने कारवाई होणार असल्यास आयोजकांना त्याची माहिती आधीच दिली जात असल्याची शक्यताही आहे. धिरयो हे जास्त करून पहाटेच्या वेळी आयोजित केले जातात. यावेळी गस्त घालण्यात किंवा कडक पावले उचलण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसते. जोपर्यंत पोलीस कठोर पावले उचलत नाहीत, तोपर्यंत मूक प्राण्यांचा छळ आणि कायद्याचा अपमान थांबणार नाही. त्यांनी आतापर्यंत केवळ बघ्याची भूमिका घेतली, पण यापुढे गुन्हेगारांना जरब बसेल अशी कृती व्हावी, अशीच मागणी होत आहे.

- अजय लाड