कर्तृत्ववान दामिनी

असे म्हटले जाते की, एखादी गोष्ट मिळवण्याची मनात इच्छा आणि मनगटात ताकद असेल तर ती साध्य करण्यास तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. गोष्ट आहे मोले सत्तरी येथे राहणाऱ्या आणि साक्षात अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त लाभलेल्या दामिनी गुरुदास डेगवेकर यांची.

Story: सिंथिया कृष्णा गावकर |
14th January 2022, 11:22 Hrs
कर्तृत्ववान दामिनी

जन्म १२ फेब्रुवारी १९७३ साली साखळी तालुक्यातील आमोणा गावात झाला. घरात आईवडील, दोन बहिणी आणि तीन भाऊ असा परिवार. संपूर्ण गावात त्यांना सरिता या नावाने ओळखत असत. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी आपलं दहावीपर्यंतच शिक्षण पूर्ण करून १९९१ साली गावातील दुग्ध उत्पादन केंद्रात नोकरी मिळवली. यामुळे कुटुंबाला पण आधार वाटू लागला. आपण जास्त शिकलो नाही पण आपल्या बहिणीने तरी किमान बारावी पास करावी या हेतूने त्यांनी आपल्या बहिणीला शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले.

१६ एप्रिल १९९५ साली त्यांची लग्नाची गाठ श्री. गुरुदास डेगवेकर यांच्याशी बांधण्यात आली आणि  दामिनी परब ह्या दामिनी डेगवेकर झाल्या.

त्यांचे पती शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्यांना महिला सशक्तिकरणाचे महत्त्व माहीत होते. लग्नाच्या काही वर्षानंतर दामिनी यांनी आपल्या पतीच्या पाठिंब्याने स्वयंपाक प्रशिक्षण वर्गात प्रवेश मिळवून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शिकण्यास सुरुवात केली. पाककलेचे शिक्षण घेताच त्यांनी पुढाकार घेऊन इतर महिलांच्या मदतीने विविध समारंभासाठी अन्न पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या हाताची चव प्रत्येकाच्या तोंडपर्यंतच नव्हे तर हृदयात शिरली. आणि याच कारणामुळे संपूर्ण गोव्यात त्यांची वाहवा होऊ लागली. वैयक्तिक प्रगतीपेक्षा त्यांनी आपल्या अवतीभोवती राबणाऱ्या महिलांच्या विकासाकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. म्हणूनच प्रत्येक महिलेला त्या आपल्याशा वाटू लागल्या.

अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना डी.आर.डी. ए च्या सरकारी योजने अंतर्गत सी.आर.पी म्हणजेच कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणून पदवी मिळाली. नव्या पदाबरोबर नवीन जबाबदाऱ्या आणि अनेक नवीन आव्हानं येतात. महिलांसाठी सक्षमपणे उभ्या राहू इच्छिणाऱ्या दमिनींना आता यशाची वाट सापडली होती. त्यांनी सरकारच्या सानुधारित योजनांचा लाभ घेत गावातील महिलांसाठी आरोग्य शिबिरे, पोषण मास, महिला दिन, सणांनिमित्त विविध कार्यक्रम त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यशाळा राबविल्या.

हे सगळं करीत असताना त्यांनी आपली पाककलेची आवडही जोपासली. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा इतरांनाही फायदा व्हावा म्हणून त्यांनी पाककला कार्यशाळा आयोजित केल्या आणि सहभागी महिलांना आपणहून निःशुल्क प्रशिक्षण दिले.

सध्या त्या मोले, सत्तरीतील गावात कम्युनिटी रिसोर्स पर्सन म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्या आर्थिक दृष्ट्या कोणावरही अवलंबून न राहता आपल्या पतीच्या आणि मुलांच्या मदतीने स्वत:चा जेवण पुरवण्याचा व्यवसाय सांभाळत आहेत. एका सामान्य परिवारातून आलेल्या दामिनींना हा एवढा लांबचा प्रवास सोपा तर नक्कीच नव्हता. पण त्यांनी त्यांच्या मनगटाच्या बळावर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तो साध्य करून दाखवला. त्यांच्या या समाज कार्याला संपूर्ण स्त्रीशक्तीचा सलाम.

शेवटी एवढंच सांगावसं वाटत की, त्यांच्यासारख्या महिलेला जर गावाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर त्या मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवतील.