जिद्द आणि चिकाटीचे द्योतक : माझे बाबा

माझे बाबा म्हणजे जिद्द . माझे बाबा म्हणजे प्रचंड चिकाटी. माझे बाबा म्हणजे उत्साहाचा सळसळता झरा. माझे बाबा म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा सदैव हसरा चेहरा. माझे बाबा म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्त्व.

Story: माझे बाबा | तन्मयी भिडे |
14th January 2022, 11:20 pm
जिद्द आणि चिकाटीचे द्योतक : माझे बाबा

बाबांबद्दल लिहायला घेतलं तेव्हा कुठून सुरुवात करू समजत नव्हतं कारण इतकं काही सांगण्यासारखं आहे. लहानपणापासून मी त्यांना बघत आले आहे. बाबांचे सतत प्रचंड कार्यक्रम सुरु असायचे. लहानग्यांसाठी असलेला 'बे दुणे चकली', कविता, गायन, शीळ वादन, हस्ताक्षर मनोविश्लेषण  असे त्यांचे अनेक विविध पैलू  उलगडून दाखवणारा ''सबकुछ मधुसूदन" अशा अनेक एकपात्री असंख्य प्रयोगांमध्ये बाबा सतत व्यस्त असायचे. माझ्या शाळेत एकदा बाबांचा ''बे दुणे चकली '' कार्यक्रम शाळेने ठेवला होता. गच्च भरलेलं  शाळेचं  सभागृह,  मुलांच्या खिदळण्याने अगदी दुमदुमून गेलं होतं. कार्यक्रम संपल्यावर सगळी मुलं घाणेकर काकांची मुलगी म्हणून खूप कुतूहलाने माझ्याकडे बघत होती. तेव्हा मला जो ''बाबांची मुलगी'' असल्याचा खूप अभिमान वाटला होता तो अजूनही तस्साच आहे आणि राहील . अनेक गोष्टींमधून, प्रसंगांमधून आपले बाबा हे जगावेगळे आहेत असं कायमच मला वाटत आलं आहे. स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून राबवलेले असंख्य सामाजिक उपक्रम, त्यात आवर्जून उल्लेख करावा अशी ''नेत्रदान हे श्रेष्ठदान'' असा संदेश देणारी कश्मीर ते कन्याकुमारी रेल्वेयात्रा, कॅन्सरग्रस्त रुग्णांना, वृद्धाश्रमातील आजी आजोबांना, अनाथाश्रमातील चिमुरड्यांना, विशेष मुलांना दोन घटका आनंद मिळावा या केवळ एका हेतूने केलेले असंख्य कार्यक्रम यातून माझा बाबांबद्दल वाटणारा आदर वाढतच गेला . 

बाबांबद्दल अजून एक आवर्जून सांगायचं म्हणजे स्वतःला संधी मिळावी, व्यासपीठ मिळावं म्हणून सगळेच धडपडतात, परिश्रम घेतात.  बाबांनी  मात्र आतापर्यंत  हजारो लोकांना त्यांच्यातील कलागुणांना पारखून, परतफेडीची कसलीही अपेक्षा न बाळगता व्यासपीठ उपलब्ध करून दिले, अनेक संधी दिल्या.

मी आणि माझी मोठी बहिण ऋचा थत्ते  बाबांपासून प्रेरणा घेत आम्ही साहित्य, संगीताची जोपासना करू लागलो. ऋचा सध्याची  आघाडीची लेखिका, निवेदिका आणि एकपात्री कलाकार आहे. आणि माझं देखील गायन, संगीत दिग्दर्शनावर अतिशय प्रेम आहे. आम्हाला दोघींनाही  बाबांनी आमच्या प्रत्येक नवीन उपक्रमासाठी अगदी मनापासून पाठिंबा दिला . 

मी सहावीत असताना बाबांना severe heart attack आला आणि बाबांची bypass surgery करावी लागली. आता बाबांचे सगळे व्याप जरा कमी होतील असं वाटलं होतं पण phoenix पक्षी जसा राखेतून भरारी घेतो तशी त्यांनी जोमाने भरारी घेतली.  अगदी hospital मध्ये असताना सुद्धा त्यांनी सुरेख कविता लिहिल्या ज्यांचा पुढे कवितासंग्रह प्रकाशित झाला.  या मोठ्या आजारपणानंतर सुद्धा त्यांनी अनेक उपक्रम राबवले. 'डहाळी' या अनियतकालिकाचा जन्म हे त्यापैकीच एक. नाव जरी अनियतकालिक असलं तरी बाबांनी कमालीच्या सातत्याने  १० वर्षांहून अधिक काळ अनेक  विविध विषय घेऊन डहाळी प्रकाशित केला. इतकंच नाही तर corona सारख्या मोठ्या आजारपणानंतरही त्यांनी हस्तलिखित स्वरूपात अनेक डहाळी अंक प्रकाशित केले . १६ डिसेंबरला राबवलेली सहीयात्रा हे अजून एक उदाहरण .  भारत - पाक युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाली त्याची आठवण म्हणून देशप्रेमापोटी आणि लोकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत व्हावी या हेतूने  तब्बल १२ तास बाबांनी सहीयात्रा राबवली, ज्यात रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ज्यात  'भारत माता की जय' हा नारा लिहून घेऊन त्या व्यक्तीच्या अक्षरावरून तिचा विनामूल्य स्वभाव सांगितला. विशेष बाब म्हणजे या उपक्रमात भाजीवाले, फुलवाले, शाळेत जाणारी छोटी मुलं ते अगदी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना समाविष्ट केलं गेलं.

बाबांबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच. मला कायम वाटतं की बाबा जर पु.लं.ना जरा आधी भेटले असते तर व्यक्ति आणि वल्लीच्या अनुक्रमणिकेत 'मधुसूदन घाणेकर ' हे नाव नक्की झळकलं असतं. बाबांना बाहेर इतकी लोकं ओळखतात, त्यांचं काम इतकं मोठं आहे तरी माझ्यासाठी  मात्र ते 'माझे लाडके बाबा 'च  आहेत. माझ्या अगदी छोट्याछोट्या गोष्टींचं देखील भरभरून कौतुक करणारे, माझे लाड करणारे आणि माझ्या कलागुणांना मी जपावं म्हणून प्रचंड प्रोत्साहन देणारे. 

अजून काय लिहू?

शेवटी मी देवाकडे एकच प्रार्थना करेन की जिथे जातील तिथे आनंदाची पखरण करणारे, आपल्या उत्स्फूर्त अशा शाब्दिक नर्मविनोदी कोट्यांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे, आणि भोवतालचं वातावरण नेहमीच हलकंफुलकं आणि खेळीमेळीचं ठेवणारे माझ्या बाबांसारखे  बाबा प्रत्येकाला मिळोत आणि  बाबांना भरभरून सुख, समाधान, आनंद आणि उदंड आयुष्य लाभो आणि असंच सुंदर काम त्यांच्या हातून घडत राहो !!