'ओ सायबा'च्या संस्थापक : स्नेहा नाईक

‘गोयची घरकान्न’ या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून महिलांनी आपल्या पायावर आत्मनिर्भरपणे उभे रहावे हा संदेश देणारी स्वयंपूर्णा…

Story: स्वयंपूर्णा । प्रीती केरकर |
14th January 2022, 11:10 pm
'ओ सायबा'च्या संस्थापक : स्नेहा नाईक

‘ओ सायबा’हे उत्पादन संपूर्ण गोव्यात तसेच गोव्याबाहेर सिंगापूर व मॉरिशसमध्ये घरगुती मसाले आणि खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे. आता तुम्ही विचाराल ‘ओ सायबा’ची संस्थापक आहे तरी कोण? तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्याच गोव्यातील मांद्रे गावात राहणारे नामवंत व्यापारी व व्यावसायिक मुकुंद नाईक यांची धाकटी कन्या स्नेहा नाईक.

स्नेहाने व्यवसायाचे धडे लहानपणापासून आपल्या आईकडून गिरवले. स्नेहा सांगते की, आई कमी शिकली असली तरी ती व्यवसायात कमालीची तरबेज होती. आई दुधाचा व्यवसाय करायची. वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती लाडू, मसाले बनवून त्याची विक्री करायची. तसेच तिने बनवलेल्या गरम मसाल्याची मागणी मुंबईहून असायची. स्नेहा पुढे सांगते की आपल्या आईला पाहून प्रेरित होऊन तिने ‘ओ सायबा’ या नावाचे उत्पादन सुरू केले. तिच्या व्यवसायातील खरा आदर्श तिची आई होय.

डिसेंबर १९९५ साली स्नेहाचे लग्न बार्देश तालुक्यातील कामुर्ली गावचे विलास नाईक यांच्यासोबत झाले. ते फेडरल बँक, नाशिक या शाखेत अधिकारी होते. लहानपणापासून नवीन गोष्टी शिकून घेणे हा स्नेहाचा छंद. स्वतंत्र विचारांची, मनमोकळे बोलणारी आणि प्रेमळ स्वभावाची अशी स्नेहाची ओळख. १९८९ साली तिच्या भावाने तिला दुचाकी चालवण्यास शिकवले. स्नेहाचा स्वभाव एकदम बिनधास्त. कधीच रिकामी न बसणारी स्नेहा वेळ मिळताच वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करी. उदा. मुलाला शाळेत सोडल्यानंतर जो वेळ असायचा त्या वेळेला ती कार चालवण्यास शिकली. तिच्या नवऱ्याची बदली कोल्हापूर येथील फेडरल बँक शाखेत झाली तेव्हा आपल्या मुलाला घेऊन ती नवऱ्याला भेटायला कार चालवून थेट कोल्हापूर गाठायची.

२००१ या साली स्नेहाने पेडणे तालुक्यातील तुये या गावात स्वत:चे घर बांधले. आता ती कामुर्लीतून तुयेमध्ये पोहचली. तिला स्वत:चे असे काहीतरी करायचे होते. स्नेहा संगणक संस्थामध्ये शिकवायची तसेच संध्याकाळी घरी आल्यावर इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतचे शिकवणी वर्ग घ्यायची. स्नेहाचा मुलगापण आपल्या आईप्रमाणेच तल्लख बुद्धीचा म्हणूनच गोवा बोर्डामध्ये बारावीत त्याने दुसऱा क्रमांक प्राप्त केला. तो उत्कृष्ट फुटबॉलपटू आहे. जेव्हा मुलांना सुट्ट्या पडतात तेव्हा ती त्यांचे आवडीचे छंद वर्ग घ्यायची. त्यात ती मुलांना हस्त पेटिंग, रांगोळी, सोफ्ट टॉय आणि कृत्रिम दागिने बनवायला शिकवायची. 

२००५ साली तिने बचत गट स्थापन करून गटात काम कसे करावे, कर्ज कसे द्यावे व ते परत कसे करावे याबद्दलचे सर्व ज्ञान महिलांना देवू लागली. हिशोबाची पुस्तके वही कशी हाताळावी ते दाखवत असे. सर्व कसे सुरळीत चालले होते पण अचानक पतीच्या मृत्यूनंतर ती खूप हताश झाली. सगळी कामे तिने बंद केली.

२०१८ साली ती पुन्हा बचत गटात रूजू झाली. २०१९ साली ‘ओ सायबा’ मसाले आणि घरगुती गावठी उत्पादन तिने बाजारात आणले. तिचे पहिले उत्पादनाचे प्रदर्शन तिने बेळगाव, कर्नाटक येथे सुचिता इनामदार ‘अपना बाजार’ ह्यांच्याकडे केले. तिथेच तिची ओळख मॅडम पौर्णिमा शिरीसक यांच्याकडे झाली. पौर्णिमा मॅडम स्वत: 'झेप उद्योगिनी'च्या संस्थापक आहेत. तसेच त्याच्यामुळे तिला वर्ल्ड ड्रेड सेंटर, मुंबई येथे प्रदर्शने लावण्यास मिळाले. तद्नंतर स्नेहाने बंगळूरु, देशाबाहेर सिंगापूर व मॉरिशस येथेसुद्धा आपली उत्पादने प्रदर्शनास लावली. येथूनच तिची ओळख डीआरडीएच्या जीएसआरएलएम या ‘स्त्रीशक्ती’ योजने अंतर्गत सेल्फ हेल्प ग्रुपमधील काही महिलांकडे झाली. स्नेहाने आपला ग्रुप (‘भूतनाथ’ सेल्फ हेल्प ग्रुप) त्याला जोडला, तिने डीआरडीए अंतर्गत मिळणारे सर्व प्रशिक्षण लवकरच आत्मसात केले. तरबेज बुद्धी असल्याने प्रत्येक गोष्ट मनापासून समजून करायची म्हणूनच तिची निवड ग्रामसंघ ‘कल्पवृक्ष’ तुये पेडणे येथे चेअरपर्सन म्हणून झाली.

‘गोयची घरकान्न’ ही तिने खास आपल्या पायावर आत्मनिर्भरपणे महिलांनी रहावे म्हणून ‘फेसबुक’ ग्रुप केला आहे. ती सतत सेल्फ हेल्प ग्रुपसाठी कार्यरत असते. ती सांगते सेल्फ हेल्प ग्रुपमुळेच पुन्हा आपल्या जीवनाची सुरूवात नव्याने करून शकली.

(जिल्हा ग्रामीण विकास संस्था (DRDA) यांच्या सौजन्याने)