आठ दिवस धोक्याचे!

दिवसाला आढळतील १०-१५ हजार कोविड रुग्ण : डॉ. शेखर साळकर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th January 2022, 12:22 Hrs
आठ दिवस धोक्याचे!

पणजी : राज्यासाठी पुढील आठ दिवस धोक्याचे आहेत. २० जानेवारीच्या दरम्यान राज्यात दररोज १० ते १५ हजार कोविड रुग्ण सापडू शकतात असा अंदाज वर्तवत, गोमंतकीय जनतेने कोविडसंदर्भात सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी गुरुवारी केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोविडची तिसरी लाट धुमाकूळ घालत आहेत. चोवीस तासांत तीन-साडेतीन हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. बाधित होण्याचा दर ३० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कोविड परिस्थितीत दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. २० जानेवारीपर्यंत ही स्थिती आणखी गंभीर होऊन प्रत्येक दिवसाला १० ते १५ हजार नवे रुग्ण सापडू शकतात, असे डॉ. साळकर म्हणाले.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळासह (गोमेकॉ) खासगी इस्पितळांतील डॉक्टर आणि परिचारिकाही बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण येऊन ती यंत्रणा कोलमडूही शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांत गोव्याप्रमाणेच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. परंतु, त्यानंतर ती कमी होत गेली. गोव्यातही पुढील दहा-पंधरा दिवसांनंतर तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. २४ जानेवारीनंतर राज्यातील कोविड रुग्णही कमी होऊ शकतात. त्यामुळे गोमंतकीय नागरिक आणि पर्यटकांनी पुढील आठ दिवस पूर्ण काळजी घ्यावी. राज्य सरकारने कोविड प्रसार रोखण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी फिरताना शारीरिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन डॉ. साळकर यांनी केले.
दरम्यान, आरोग्य खात्याने लसीकरणास गती दिल्यामुळे गेल्या काही दिवसांत कोविडवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पुन्हा कोविडचा संसर्ग होऊ शकतो. परंतु, ते गंभीर होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

इस्पितळांत दाखल होणाऱ्यांची संख्या कमी

राज्यात कोविडबाधितांची संख्या वाढत असली, तरी गोमेकॉ आणि इतर खासगी इस्पितळांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. बुधवारपर्यंत गोमेकॉ व इतर खासगी इस्पितळांत कोविडचे सुमारे ११५ रुग्ण उपचार घेत होते. त्यातील केवळ दोघेजण व्हेंटिलेटरवर असून, पाच जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. या सातही रुग्णांना इतर आजार आहेत. तर अवघ्या २५ जणांना साधा ऑक्सिजन देण्यात आला आहे, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीचा सरकारला सल्ला

- पुढील काळात गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी विभागात ५४० खाटा आहेत. पुढील काळात त्या पूर्ण भरल्या आणि त्यातील २०० रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली, तर सरकारने पर्यटनासह इतर क्षेत्रांवर निर्बंध घालावे.
- ५० टक्के रुग्णांना ऑक्सिजन लागला तर दक्षिण आणि उत्तर गोव्यातील दोन्ही इस्पितळे कोविडसाठी कार्यरत करावीत.
- तिन्ही इस्पितळांतील प्रत्येकी ५० टक्के ऑक्सिजन खाटा भरल्या तर मात्र सरकारने कर्फ्यूबाबत विचार करावा.

नवे ३,७२८ रुग्ण; चौघांचा मृत्यू

राज्यातील कोविडबाधितांचा उद्रेक गुरुवारीही कायम राहिला. बुधवार आणि गुरुवारच्या चोवीस तासांत नवे ३,७२८ रुग्ण आढळले. चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे सक्रिय बा​धितांची संख्या १६,८८७ वर गेली आहे. याच कालावधीत आणखी ९७१ जण कोविडमधून मुक्त झाले. परंतु, कोविडमधून बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त असल्याने राज्यातील बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८९.९३ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.