माहेरच्या वाटे हळदकुंकू दाटे...

Story: आनंद सोहळा।राजश्री खांडेपारकर |
09th January 2022, 12:30 am

भुलाबाईच्या गाण्यांमध्ये बहुदा सासर नकोसं आणि माहेर हवेहवेसे. रंगवलेलं असायचं.  सासू, नणंद, दीर, सासरा परकी मंडळी..आई, बहीण, भाऊ, वडील आपले, माहेरी कौतुक तर सासरी जाच. 

"अस्सं माहेर गोड बाई खेळायला मिळते, अस्सं सासर द्वाड बाई कोंडून मारिते ", "सासरच्या वाटे कुचू कुचू काटे,  माहेरच्या वाटे हळदकुंकू दाटे"  

लहानपणीचं अबोध वय नकळत ते मनावर ठसायचं...असंच असेल का खरंच, असं वाटायचं.. हळूहळू मोठं होताना चांगुलपणावरचा विश्वास दृढ होत गेला. असे नसेलच मुळी, ही खात्री पटत गेली आणि प्रेमळ सासू-सासरे नणंदा, दीर, जावा असलेल्या मोठ्या एकत्र कुटुंबाचा मी हिस्सा झाले. आधी नवर्‍याशी बोलताना तुझं घर- तुझी लोकं, 'तुझं तुझं' करत, ते 'माझं घर', 'माझी माणसं' कशी झाली, हे माझं मलाच कळलं नाही.

पण, तरीही,  माहेर ते माहेरच… इतकी वर्ष झालीत लग्नाला, माझ्याकडे आता सून यायची झाली,  पण अजूनही माहेरची तीच ओढ कायम असते मनात. 

विमानात घोषणा होत होती, गोवा नागपूर की दूरी हम एक घंटा पैंतालीस मिनट मैं पूरी करेंगे… मला कुठे धीर तेवढा. मी लावले पंख मनाला अन् पोहचले आईच्या अंगणात. भाकरी-पोळीचा तुकडा आणि पाणी घेऊन, आधी लगबगीनं येणारी आई, आता  वयपरत्वे, सावकाश तोल सावरत येताना दिसली. तोंडाने काही पुटपुटत तो भाकर तुकडा ओवाळून टाकला, पायावर पाणी घातलं. मी नमस्काराला  खाली वाकल्याबरोबर तिचा मायेचा हात डोक्यावर पडला आणि डोळ्यातून टचकन पाण्याचा थेंब गालावर उतरला. अगदी नेहमी असंच होत असतं. हा पाणमोती तिला भेटून होणार्‍या आनंदाचा, की तिच्यापासून दूर रहात असल्याच्या दुःखाचा, हे कळतच नसतं...आजकाल पैशानं सगळं सगळं मिळतं म्हणे, पण हे तिचं आपल्याला मिळणारं प्रेम,  आपुलकी, काळजी कुठे मिळेल का ?

आईची वेगवेगळी रुपं डोळ्यापुढे येतात. लहानपणचं आपलं सारं भावविश्व तिच्या भोवती आणि तिचं आपल्या… एकमेकींसोबतचा प्रवास दोघींनाही कायम आठवत असतो. बालक मंदिरात बोटाला धरून पोचवणारी, श्री गणेशा गिरवून घेणारी,  रामरक्षा, मारुती स्तोत्र शिकवणारी, निगुतीनं स्वादिष्ट स्वयंपाक करायला शिकवणारी, रेखीव रांगोळी घालायला शिकवणारी आई. स्पर्धांना, परीक्षेला जाताना हातावर कवडीचं घट्ट गोड दही घालणारी, माझ्या अगदी नासुकल्या गोष्टीचं मोठ्ठं कौतुक करणारी. कधी रागावून तर कधी प्रेमानी चुका दाखवणारी...किती तरी रूपं तिची. सगळीच खूप खूप सुंदर..कॅलिडोस्कोपच्या  काधिक सुरेख प्रतिमांसारखी.

पप्पा पण खूप थकलेत आता. 'शरीर शरीराचं काम करतं..आपण आपलं करावं,' म्हणून तेच आपल्याला समजावतात. स्वत:च्या शारीरिक व्याधी विसरून,  माहेरवाशीण लेकीचं किती कौतुक करू आणि किती नाही,  असं त्यांना वाटतं...सकाळी गाठणाऱ्या थंडीत, अंथरूणात आईची गोधडी पांघरुन लोळताना, आई पप्पांचा प्रेमळ हात डोक्यावर फिरतो. माझ्या आवडी लक्षात ठेवून, इतर जिन्नसांसोबत खास प्रेम ओतून छान छान पदार्थ बनतात. येतेस का माझ्याबरोबर स्कूटरवर, असं म्हणत, ह्या वयात,  टेकडीवरच्या गणपतीला पप्पा मला नेऊन आणतात...सांगा, सुख म्हणजे अजून ते काय...निरपेक्ष, निर्हेतूक प्रेम आई वडीलांचं..खरंच, असं म्हणावंसं वाटतं, "आम्ही भाग्यवान..आनंद निधान.." अमूल्य ठेवा हा, शाश्वत उरणारा… ह्या आनंदाला कारणाची गरजच  उरत नसते. नुसत्या आठवणींनी ही आनंद तरंग उठतात..

माहेर ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ काही असू दे,  माझ्यासारख्या सर्व सासुरवाशीणींसाठी ती असते एक हळवी भावना. सदैव खळखळत वाहणारा, प्रेमाचा, आनंदाचा हसरा  निर्झर.

आता कधीकधी आमच्या भूमिका बदललेल्या असतात, आईलाही तिच्या लेकीत,  तिची काळजी करणारी आई बघायला आवडत असेल. म्हणून मी ही कधी तिची आई होते. मला श्रीगणेशा शिकवलेल्या आईला व्हॉटस् app,  फेसबुक  गूगलसोबत बॅंकिंग- मुच्युअल फंडस् सुद्धा शिकवते.

खरंच, उंबरठ्यावर माप ओलांडून नव्याने प्रवेश केलेल्या आपल्या आयुष्यात आपले आई , वडील ,सहोदर आणि सारी माहेरची नाती खूप पाठी उरतात नं ..मागे वळून बघताना डोळ्यात पाणी साकाळतं.. 

परत जाण्याचा दिवस उजाडतो..जडावलेल्या मनानी इकडे आईची लगबग सुरू असते, नातवंडांना,  जावयाला प्रेमाचा खाऊ, भेट वस्तू,  लेकीला प्रवासाची शिदोरी, मग माहेरवाशीण म्हणून रितसर ओटी ... भरताना उदंड सौख्य लाभों, औक्षवंत हो, अखंड सौभाग्यवती हो, म्हणून आशीर्वाद देते ती ..

खूप कठीण जाते निरोप घेणं..पण

माझं घर माझी वाट बघत असल्यामुळे परतणे तर अनिवार्य असतं.. मागे राहू पाहणार्‍या माझ्या मनाला, पुढे पडणार्‍या पावलांसोबत घेऊन निघते तेव्हा, मनात शांताबाईंची ही कविता संथ लयीत बोलत रहाते..

"अजुनही असते तिच्यापाशी नखभर काजळ ...

माझ्या जळजळत्या डोळ्यांसाठी, 

आणि चिमुटभर अंगारा 

माझी असलीनसली इडापिडा 

टाळण्यासाठी. 

मऊसुत गोधडीची हवीहवीशी उब 

मला वेढून असते तिच्या आसपास, 

आणि बाळजीभ जागी करतो 

तिच्या हातचा एखादा घास. 

तिच्यापाशी जाताना 

एकेक वर्ष सालीसारखे गळत जाते 

अंगावरून, 

कोवळे आनंदवय 

हसत हसत सामोरे येते दुरून 

माझे तान्हेपण सुखरूप 

तिच्या संरक्षक ओटीत, 

प्रत्येक नव्या भेटीत, मनाच्या मिठीत..."