भविष्यात होणाऱ्या भूकंपाची पूर्वकल्पना देणे शक्य आहे का?

भूकंपप्रवण क्षेत्रात शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या साधन सुविधांचा वापर करून नानाविध प्रयोग केले आहेत. काही शास्त्रज्ञांना यात थोडेफार यश मिळाले असले तरी एकाही शास्त्रज्ञाला किंवा शास्त्रज्ञ संघाला अद्याप येऊ घातलेल्या भूकंपाविषयी आगाऊ माहिती मिळवणे शक्य झालेले नाही.

Story: वाचावे असे।डॉ. राघव गाडगीळ |
09th January 2022, 12:29 Hrs
भविष्यात होणाऱ्या भूकंपाची  पूर्वकल्पना देणे शक्य आहे का?

 ते संपूर्ण मानवजातीला शेकडो वर्षांपासून भेडसावणारा हा प्रश्न दिसतो तसा सोपा, पण सत्यात पाहिले तर आहे एका कोड्यासारखा. आपल्या भारतात पश्चिम, उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशेच्या सर्व राज्यात राहणाऱ्या लोकांसाठी भूकंप हा दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. माणसाने आजच्या काळात खूप प्रगती केली असली तरी अजून त्याला भूकंप कधी येणार याचे अचूक भाकीत करता येणे शक्य झालेले नाही. 'भूकंप' या घटनेविषयी असलेल्या अज्ञानामुळे पुरातन काळात काही मानवसंस्कृतींनी भूकंपाच्या घटनेला देवाचे स्वरूप मानले होते. भूकंप म्हणजे जणू माणसाच्या हातून घडणाऱ्या चुकांमुळे देव-देवतांचा होणारा कोप असाही एक समज होता. आता जरी वैज्ञानिकांच्या दृष्टीने भूकंप कधी येणार हे अचूकपणे सांगता येत नसले तरी, भूकंप म्हणजे  देवतांचा प्रकोप नव्हे, हे  एवढे तरी निश्चित सिद्ध झाले आहे. मी एक भूगर्भशास्त्रज्ञ असल्याने बऱ्याच वेळा मला 'माणूस भूकंपाची भविष्यवाणी करू शकतो का? किंवा येणाऱ्या भूकंपाची प्राण्यांना लागणारी चाहूल, यात किती तथ्य आहे?' असे प्रश्न विचारले जातात. 'भूकंप' या घटनेचे वेगवेगळे पैलू आपण आता पाहूया.

 भूकंप याचा संधीविग्रह ‘भू’+’कंप’ असा होतो. यातील 'भू' म्हणजे जमीन (पृथ्वी) व 'कंप' म्हणजे हादरणे किंवा हलणे. पृथ्वीच्या अंतर्गत होणाऱ्या हालचालींमुळे जमीन कंप पावणे किंवा हादरणे म्हणजे भूकंप. पृथ्वीचे अंतरंग मुख्यत्वे तीन स्तरांचे बनलेले असते. सर्वात वरचा स्तर भूकवच (crust), त्याखालील स्तर प्रावरण (mantle) आणि सगळयात खालचा स्तर गाभा (core). भूकवच आणि त्याखालील प्रावरणाचा थोडा भाग मिळून शिलावरण (lithosphere) हा १०० किलोमीटर जाडीचा स्तर बनतो. हा स्तर अनेक छोट्या छोट्या भूभागांमध्ये (lithospheric plates) विभागलेला असतो. भूगर्भात सतत होणाऱ्या हालचालींमुळे हे भूभाग वेगवेगळ्या दिशांनी हळूहळू सरकत असतात. त्यांच्या या अंतर्गत घर्षणामुळे भूकंपाची क्रिया घडते.  उदा. भारत देशाचा भूभाग उत्तरेकडे आशिया खंडाच्या भुभागाकडे सरकत असल्याने संपूर्ण हिमालय पर्वतरांगांमध्ये कमी- अधिक तीव्रतेचे भूकंप सतत होत असतात.

भूगर्भशास्त्रात जशी जशी प्रगती होत आहे तसतशी ती सामान्य माणसाच्या उपयोगी कशी पडेल यावरच जास्त भर दिला जात आहे. किंबहुना शास्त्रज्ञांवर तशी नैतिक जबाबदारीच आहे. भूकंपप्रवण क्षेत्रात शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या साधन सुविधांचा वापर करून नानाविध प्रयोग केले आहेत. उदा. खडकांची घनता तपासणे, विभिन्न स्तरातील होणारे चुंबकीय बदल, भूगर्भ जलातील बदल किंवा भूगर्भातील   दगडांमधील ताण बदल अभ्यासणे इत्यादी. ह्या घटकांचा एकमेकांशी असलेला परस्परसंबंध व त्यामुळे होणारे भूगर्भातील बदल एवढे संवेदनशील असतात की त्यावरून होणाऱ्या भूकंपाचे भाकीत करणे खूपच अवघड आहे. काही शास्त्रज्ञांना यात थोडेफार यश मिळाले असले तरी एकाही शास्त्रज्ञाला किंवा शास्त्रज्ञ संघाला अद्याप येऊ घातलेल्या भूकंपाविषयी आगाऊ माहिती मिळवणे शक्य झालेले नाही. शास्त्रज्ञांनी भूकंपाच्या केंद्रातून तयार होणाऱ्या दोन प्रकारच्या लहरींचा इत्थंभूत अभ्यास केलेला आहे. या अभ्यासाच्या आधारे भूगर्भ शास्त्रज्ञ जेव्हा पृथ्वीवर एखाद्या क्षेत्रात भूकंप होतो तेव्हा त्याचे आजूबाजूच्या प्रदेशावर होणारे परिणाम फक्त काही सेकंदाआधी वर्तवू शकतात. अशावेळी भूकंपामुळे होणारे परिणाम आणि हानी टाळणे वेळेअभावी अशक्य होते. त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांचा हा निष्कर्ष निव्वळ निरर्थक असतो.

खूप जुन्या काळापासून चालत आलेला आणखी एक समज म्हणजे प्राण्यांच्या काही संवेदना माणसांपेक्षा जास्त जागृत असतात. म्हणून भूकंप होण्याआधी वारुळातल्या मुंग्या अचानक सैरावैरा धावत वारुळाबाहेर येऊ लागतात, कुत्रे विचित्र आवाजात भुंकायला लागतात वगैरे वगैरे. यात अजिबात तथ्य नाही असं म्हणण्यापेक्षा जिथे शास्त्रीय आधार सापडत नाही तिथे अशा समजुती वेगाने फोफावतात. माणसाच्या मुळच्या जिज्ञासू वृत्तीला जेव्हा काही वैज्ञानिक खुलासा सापडत नाही तेव्हा तो मिळेल तिथे सोयीस्कररित्या उत्तर शोधत फिरतो. काही शास्त्रज्ञांनी भूकंपा आधी होणाऱ्या प्राण्यांच्या विचित्र वर्तनांचा अभ्यास केलेला आहे. यात मुंग्या, कुत्रे, गायी-गुरे, उंदीर, सरपटणारे प्राणी व हत्तींचा सुद्धा समावेश आहे. वैज्ञानिकांनी या अभ्यासात तपासलेल्या नमुन्यांची संख्या शास्त्रीयदृष्ट्या सांख्यिकिय वैधता (statistical validity) सिद्ध करण्यासाठी फारच कमी आहे. कमी नमुन्यांच्या अभ्यासामधून एखादा ठोस निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते. भूकंप प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे अनुभव विचारात घेतले असता ते सुद्धा प्राण्यांच्या विचित्र वागण्याला पुष्टी देतात. मानसशास्त्र यावर असे म्हणते की माणूस प्राण्यांच्या विचित्र वागण्याचा थेट संबंध भूकंप होण्याशी लावतो कारण त्याचा विचार त्यावेळी ह्याच प्रवाहाने जात असतो. भुकंपावेळी गर्भगळीत झालेले लोक कुठच्याही गोष्टीचा संबंध भूकंप होण्याशीच लावतात. प्राण्यांच्या विचित्र वागण्याला काही वेळा वेगळी कारणे पण असू शकतात, ज्याबाबत आपण अजून अनभिज्ञ आहोत. बरं, प्राण्यांचे असे वागणे 'विचित्र' या गटातच का मोडते यावरही विस्तृतपणे संशोधन करणे आवश्यक आहे. आपल्याला जे 'विचित्र' वाटते, ते प्राण्यांसाठी सामान्य असूच शकते.

काही वैज्ञानिकांनी तर सामान्य विचारांच्या परिसीमा ओलांडून अवाक करतील अशा संकल्पना सुद्धा मांडल्या आहेत. त्यातील एक म्हणजे प्राण्यांच्या शरीरातून निर्माण होणाऱ्या 'दुःखी लहरींचा' (pain waves) भूकंप होण्याशी थेट संबंध लावणे. त्यांच्या म्हणण्यानुसार कत्तलखान्यांची संख्या जास्त असलेल्या प्रदेशात भूकंप होण्याचे प्रमाण अधिक असते. कत्तलखान्यात कत्तल होणाऱ्या प्राण्यांना अतोनात क्लेश, दुःख सहन करावे लागते व त्यामुळेच त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या दुःखी लहरी पृथ्वीत प्रवेश करून जमिनीला हादरे बसविणाऱ्या क्रियेला कारणीभूत ठरतात. अशा वैज्ञानिकांची मला खरोखरच कीव करावीशी वाटते. खरंतर 'मानसिक' संवेदना व 'भौतिक' लहरी यांचा संबंध निव्वळ कपोलकल्पित व सामान्य माणसाच्या आकलन क्षमतेपलिकडचा आहे!

एकंदरीतच या सगळ्याचा सांगोपांग विचार करता असे लक्षात येते की इतकी प्रगती करूनही अजूनही माणसाच्या बुद्धीची झेप भूकंपासारख्या आपत्तीची पूर्वसूचना करण्यास असमर्थ आहे. येणाऱ्या आगमी काळात यावर अधिकाधिक संशोधन होऊन आपल्याला न समजलेले, न दिसलेले असंख्य पदर उलगडतील आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी तरी हे कोडे सुटेल असे म्हणूया....

(टीप: लेखक भूगर्भशास्त्राचे अभ्यासक असून धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय मिरामार, पणजी-गोवा या ठिकाणी भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)