आस्था की डुबकी

बनारस बनाम वाराणशी ज्या ज्या गोष्टीसाठी प्रसिध्द आहे ते ते बघितले. बनारसी सिल्कची खरेदी केली, बनारसी ठंडाई चाखली आणि 'खायके पान बनारसवाला'ची पण मजा घेतली. बनारस हिंदू विद्यापीठ पाहिलं.

Story: प्रवास | यशवंत (सुरेंद्र) शेट्ये |
04th December 2021, 11:58 Hrs
आस्था की डुबकी

शीला गेल्याने पुण्य मिळते, गंगेत आंघोळ केल्याने सगळी पापे धुतली जाऊन मोक्षप्राप्ती होते अशी माझी आई सांगायची. तिच्या त्या सांगण्याचा खरोखरीच प्रभाव पडत जाऊन काशीला जाऊन पापमुक्त होण्याचं ठरवलेलं. आज जाऊ, उद्या जाऊ करत वयाच्या साठीनंतर जाण्याचा योग आला. काशी म्हणा वाराणशी अथवा बनारस याचि देही याचि डोळा पाहिले आणि गंगामाईच्या दर्शनाने आणि गंगारतीच्या वेळेस पोचल्याने त्या नादमधूर आरतीने खरंच "मन तृप्त झाले माझे तुझ्या दर्शनी " असंच होऊन गेलं.

सर्वात प्रथम आठवले ते पं.प्रसाद सावकारांनी गायिलेले नाट्यगीत "जय गंगे भागीरथी...हर गंगे भागीरथी". नंतर ओठांवर रुंजी घालायला लागलं "गंगा तेरा पानी अमृत...झरझर बहता जाये...युगयुगसे इस देश की धरती तुझसे जीवन पाये." डोळ्यापुढे नविन निश्चल आणि योगिता बाली ही अवतरल्या. त्या तिथे चाललेल्या आरतीने तर मंत्रमुग्ध व्हायला झाले. आरती संपेपर्यंत तंद्री लागली. भारावून गेलो. पाण्यात उतरताना तर मधूर सुखाच्या धारा मनोमनी बरसल्या. पाण्यात प्रज्वलित दीप सोडताना भावूक झालो. पायांना झालेला गंगोदकाचा स्पर्श मन चिंब भिजवून गेला. गंगास्नान करण्यासाठी अधीर झालेलं मन महत्प्रयासाने आवरून लाॅज गाठला. अधीर मन झालेले लगेच निद्राधीन झाले खरे, पण स्वप्नातही "मचलती हुयी हवामे छम छम...हमारे संग संग चले गंगाकी लहरें" च दिसल्या.

पहाटे उठून गंगातिरी गेलो, पण पहाटेचा गार वारा झोंबे अंगाला झाल्याने दुपारी गंगास्नान करायचे ठरवून बोट पकडून गंगेवर स्वार झालो. गंगेत विहार करताना गंगा माझ्याशी जणू संवाद साधत विचारायला लागली..."मानो तो मैं गंगा माॅ हूं... ना मानो तो बहता पानी..." म्हणायला लागली. खरंच सगळं मानण्यावरच तर असतं. तीर्थ प्रसाद म्हटलं की सगळी भावनाच बदलून जाते अगदी तसंच. त्या गाण्यातील ती आर्तता फिरून लाटांवर स्वार असताना मनात हेलकावे खात राहीली. नंतर आठवलं संघाच्या शाखेत गायिलेले...

यह कलकल छलछल बहती 

क्या कहती गंगाधारा 

युग युगसे बहता आता 

यह पुण्यप्रवाह हमारा

ते तर चक्क गात गंगेवर मोबाईलमधे चलतचित्रण पण केलं. मग एक व्हिडिओ पण गंगेचा इतिहास आणि महत्ता सांगताना काढला. बोट वल्हविणारा केवट पण बरा भेटलेला. भरपूर माहिती सांगत होता. राजा हरिश्चंद्र आणि तारामतीची कहाणी एवढी रंगवून सांगितली, आमचे डोळे त्या पुण्यप्रतापी राजाचा इतिहास जागविताना डबडबले. या सगळ्या महाप्रतापी राजारजवाड्यांचे आम्ही वारस आहोत, त्यांचे वंशज आहोत ही भावना प्रबळ होत या सगळ्या या इथे घाटघाटपे बाटबाटपे निराळा थाट असलेल्या होऊन गेलेल्या इतिहासाशी रिलेट होताना उत्पन्न होणारी भावना अभिमाने मन रसरसली असे वाटायला लावणारी होय!

नंतर दुसऱ्यादिवशी गंगेकाठाने चालत गेलो. किती ते घाट! मोजून ८४ भरले! नांवे तरी सगळ्या देवाधिदेव आणि बलाढ्य राजांच्या स्मृती जागविणारी. अहिल्याबाई घाट, पेशवे घाट, राजा हरिश्चंद्र घाट, राजा दशरथाच्या अश्वमेध यज्ञाच्या स्मृती जागविणारा अश्वमेध घाट, प्रभू घाट, भीष्म पितामह घाट, राणाप्रताप घाट, लक्ष्मीबाई घाट, सीता घाट, पार्वती घाट, लक्ष्मी घाट, गंगामहल, लेखक मुंशी प्रेमचंदाचा मुंशी घाट, कबीर घाट, मणिकर्णिका घाट..हा तर चक्क स्मशानघाट! इकडे गेलो तर करोनाच्या काळासारख्या एकाच वेळेस वीस पंचवीस रसरशीत चिता जळताना पाहून जीवन किती क्षणभंगूर सांगणारं जीवनाचं तत्वज्ञान न सांगताच समजलं. फार भयानक आणि भेसूर भयाण असं ते प्रेतांच्या भट्टीचे स्मशान गंगातीरावर असावं याचं कूतूहलमिश्रीत अप्रूप वाटलं. बाजूलाच कबीर घाटावर संत कबीराच्याच नांवे संगीत फेस्टिव्हल पण आयोजित केलेलं. त्या तिथे झगमगाटात मोठमोठ्या गायिका तल्लीन होऊन गात होत्या. मालिनी अवस्थी जिची ओळख "जिसके स्वरोंमे गंगाकी लहरे ऊमड पडती है" अशी ओळख करून देण्यात आलेली अशा होत्या आणि कपालिनी कोमकली पण होत्या. मणिकर्णिकेवर प्रेतांचा नंगानाच चालू असतानाच इथे फेस्टिव्हलमधे मंजूळ स्वर आळवले जात होते. स्वरगंगेच्या काठावरून रागदारीने चिंब भिजून मणिकर्णिकेच्या अंगाने परतताना फिरून प्रेतयात्रांशी सामना करताना अंगावर शहारे आले. कबीराच्या दोह्यांची जागा "रामनाम सत्य है"ने घेतली. लाॅजवर परतेपर्यंत कानीकपाळी व्यापून राहिली. "रात गयी बात गयी" होऊन पहाटे पाच वाजता उठून अस्सी घाट गाठला. तिथं 'सुबह-ए-बनारस' चालू होतं. साग्रसंगीत आरत्या तिथंही होत्या. पहाटेच्या प्रशांत समयी त्या अजून धीरगंभीर आवाजात विलोभनीय भासल्या. गंगामातेच्या मंदिराकडे मात्र सरस होत्या कारण तिथं भक्तांची गर्दी ओसंडून वाहत असल्याने आणि एकूण रोषणाई वगैरे सगळं भारीच असतं. मग अस्सी घाटावरून पायी चालत परत येताना वाटेत कुणी आपल्याला पाहणार नाही आणि स्वच्छ पाण्याबरोबरच स्वच्छ जागा हुडकून तिथे गंगास्नान केलं. चांगली त्या थंड गंगौदकात कुडकुडत कां होईना आस्था की डुबकी मारली आणि जन्मभर उराशी बाळगलेली पापे धुण्याचं महत्कर्म तडीस नेलं.

बनारस बनाम वाराणशी ज्या ज्या गोष्टीसाठी प्रसिध्द आहे ते ते बघितले. बनारसी सिल्कची खरेदी केली, बनारसी ठंडाई चाखली आणि 'खायके पान बनारसवाला'ची पण मजा घेतली. बनारस हिंदू विद्यापीठ पाहिलं. मात्र बघण्यासारखे होते ते भारत कला दालन. करोनाकाळात बंद झालेलं, ते अजून काही सुरू झालं नव्हतं. भारतमाता मंदिरात जाऊन तिथे नतमस्तक झालो. काळभैरव, तुलसीमाता, दुर्गामाता, अन्नपूर्णादेवी, गणपती, मारूती सर्व पाहिले. बनारसला 'सिटी ऑफ टेंपलस्' का म्हणतात ते कळून चुकले. काशी विश्वनाथ सर्वप्रथम पाहिला, परंतु शेवटी चांगलं रांगेत उभं राहून दर्शन घेतलं. विमानाने गेलो विमानाने आलो. काळजी घेणारी आणि खर्च करणारी मुलगी असल्यावर काशी विश्वेश्वरच काय अराऊंड द वर्ल्ड बिनखर्चात जाऊन येईन.