वटहुकूम

गोवा बेट, सासष्टी व बारदेश हे जुन्या काबिजादीतील भाग. आणि ह्याच्या वरच ह्या इन्क्विझिशनची सत्ता चालत होती. गोव्याच्या इतर भागावर २०० वर्षांनंतर पोर्तुगीजांची सत्ता सुरू झाली म्हणून इतर भागांत व दमण दीव येथे हा त्रास विशेष सोसावा लागला नाही. ह्या 'इन्क्विझिशनचा' मूळ उद्देश हाच होता की, धर्मांतर झाल्यावर परत आपल्या मूळ धर्मात जाऊ नये.

Story: मागोवा | तेजश्री प्रभु गांवकर |
04th December 2021, 11:38 Hrs
वटहुकूम

आता फोंडे  ते काणकोणपर्यंत पोर्तुगीज राजवट परत सुरू झाली.सौंदेकर म्हणू लागले, जिथे आमची सत्ता होती ते राज्य आम्हास परत द्यावे. पण विजरोईने सांगितले, की ते आम्ही मराठ्यांकडून मिळवले आहे. ते आमचे आहे. पुढे  हैदरअलीने सौंदेकरांचे पुढील राज्यभाग जिंकले. अंकोला, सदाशिवगड, शिवेश्वर  हे ते भाग होते. त्यामुळे सौंदेकराचे राज्य खालसा झाले. सौदेचा राजा "सवाई इमोडी सदाशिव" ११ जानेवारी, १७६४ रोजी फिरंग्याच्या आश्रयाला आला. सौदेकरांनी येताना ४०० मोठ्या टोपल्या भरून चांदीचे दागदागिने आणले होते. त्या राज कुटुंबाला पोर्तुगीजांनी आधी गोवा बेटांतील  मौळे येथे आणि नंतर बांदोडे गावात स्थायिक केले. पण त्यांना त्यांचा सुभा दिला नाही. शेवटी सन १७९१ मध्ये सौदेकरांना वर्षाला २०,००० असुर्फ्या देण्याच्या अटीवर राज्य  स्वतःच्या  घश्यांत घातले.

मर्दनगड हातचा गेला. तो पोर्तुगीजांनी जमीनदोस्त केला, ह्याचे माधवराव पेशव्यांना खूप दुःख झाले. त्याबाबतीत हर प्रयत्नांनी सांगूनही 'व्हायसराॅयने' त्या बोलण्याकडे दुर्लक्षच केले. आता मराठ्यांचे सैन्य माघारी गेले. मग गावच्या काही लोकांनी  फोंडे महाल पोर्तुगीजांच्या जोखडांतून मुक्त करण्याचा कट केला. ह्यांत 'गोविंद शेणवी बोरकर' हे मुख्य होते. गुळूले गांवचे 'देसाई' हे त्यांचे सहाय्यक होते. तसेच ‘रायाजी नाईक बोरकर’, मडकईचे एक गृहस्थ 'भरणे', साखळी येथील 'गोपाळ शेणवी,' इत्यादी जमून मराठ्यांचे सरदार "त्रिंबक सूर्याजी " ह्यांच्याशी संगनमत करून, त्यांच्या सैनिकांची एक तुकडी फोंड्यात कोंदाळ रानांत लपवून ठेवली. उठावाची माहिती आधीच फिरंग्यांना समजली. सांखळीचा गोपाळ शेणवी फितूर झाला होता .रानातील १०९ सैनिकांना वेढा घालून त्यांना पोर्तुगीजांनी पकडले. फितूर 'गोपाळ शेणवीला' तुरूंगात टाकले. तो तिथेच  खितपत पडून मेला. 'गोविंद शेणवी'ला देहांताची सजा झाली. क्रूर दुष्ट पोर्तुगीज न्यायाधिशाने फर्मावले  की, सजा अंमलात आणण्याआधी ,' गोविंद शेणवी'ना 'ख्रिश्चनधर्माची दिक्षा द्यावी.' गोविंद शेणवीचा एक हात कापावा. नंतर त्यांचा शिरच्छेद करावा व त्यांच्या शरीराचे चार तुकडे करावेत आणि ते चार ठिकाणी  फेकून द्यावेत. "लोकांना जरब बसावी म्हणून हे करणे गरजेचे आहे .असे  त्यांना वाटत असावे आणि खरोखर त्यांना बाटवून त्याचे 'कायतान' नामकरण करण्यात आले. शिक्षेत सूट दिली. म्हणजे फक्त त्याचा हात तोडला नाही, पण शिरछेद केलाच आणि ते शीर कोदाळ भागांत ऊंचावर लटकविले. त्याच्या शरीराचे तुकडे करून बोरी भागांत ठिकठिकाणी टाकण्यांत आले. केवढी ही क्रूरता.! ही  सप्टेंबर १७७१ ची घटना होती.

सन १७७४ मध्ये धर्मसमीक्षण सभा बंद करण्यात आली. कारण पोर्तुगालमध्ये वैचारिक जागृती होत होती. धर्मलंड धर्मगुरूंनी  धर्म संस्थापनेच्या नावाखाली जनतेवर अमानुष अनन्वित अत्याचार केले होते. पोर्तुगालमध्ये तेव्हा मार्केश द पोंबाल  १७५० साली प्रधान झाला होता. त्याचे मूळ नाव ' सेबास्तियांव जुजे दे कार्व्हालु ई मेलु' होते. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊनही त्याने कायद्याचा अभ्यास केला होता. इंग्लंड, ऑस्ट्रियात त्याचे वास्तव घडले होते म्हणून तो उदारमतवादी होता. धर्मोपदेशकांना कन्फेशन (जबान्या) देणे बंद झाले. त्याचा जेजुईतावर  विशेष राग  होता. गोव्यात ह्या 'इन्क्विझिशनची स्थापना' हिंदू, मुस्लिमांचे धर्मातर करण्यासाठी, छळवादाने त्यांना ख्रिस्ती होण्यास तयार करण्यासाठीच केली होती. गोव्यात ह्या 'इन्क्विझिशनने' धर्माच्या नावाखाली मनमानी हुकूमाने नुसता ख्रिश्चनेतर लोकांच्या जीवनात छळणूकीचा नंगा नाच म्हणजे नुसता हैदोस माजविला होता. किती किती  छ्ळणूक! सीमाच नाही. एक ना दोन. अनेकानेक. गोवा बेट, सासष्टी व बारदेश हे जुन्या काबिजादीतील भाग आणि ह्याच्या वरच ह्या इन्क्विझिशनची सत्ता चालत होती. गोव्याच्या इतर भागावर २०० वर्षांनंतर पोर्तुगीजांची सत्ता सुरू झाली म्हणून इतर भागांत व दमण दीव येथे हा  त्रास विशेष सोसावा लागला नाही. ह्या 'इन्क्विझिशनचा' मूळ उद्देश हाच होता की, धर्मांतर झाल्यावर परत आपल्या मूळ धर्मात जाऊ नये आणि त्यासाठी  जुलूम तरी काय काय केले जात होते हे एकदा पहावेच.तसा वट हुकूमच काढला होता. 

ते नियम असे होते: १) लग्नात हिंदू पद्धतिची वाद्ये वाजवू नयेत. २) त्यांनी लग्नाचा हुंडा वा नजराणे देताना दायजी वा  गोत्री  स्त्री, पुरूष  यांना आमंत्रण देऊ नये. ३) लग्न झाल्यावर  महिना होण्यापूर्वी  वधूच्या घरी परतू नये. ४) लग्न होऊन वराघरी वा वधूच्या घरी जाताना कोणताच नजराणा अथवा त्या माणसांनी, तांदूळ, सुपारी, केक, नारळ किंवा खाण्याची कोणतीच वस्तू नेता कामा नये. ५) वधू  किंवा वराकडे दागिने कपडे घेऊन जाणाऱ्याने नवे कपडे घालून जाऊ नयेत. तसेच बरोबर स्वतःसाठी जुनेच कपडे घ्यावेत. ६) मुळीला (कामकरी) लग्नासंबंधी काहीही देऊ नये. ७) लग्नातील मेजवानीतील काही एक सामान नंतर वापरण्यासाठी बाजूला काढून ठेवू नये. तसेच वधू वरांकडे पाठविण्यास  पान, सुपारी, नारळ, कडधान्ये, तांदूळ, खाण्याचे जिन्नस टोपलीत, सुपात, मडक्यात कोणीही  ठेवू नयेत. ८) लग्नासाठी केलेल्या चुलीखाली  पान-सुपारी वा इतर चुलीसाठी  लागणारे काहीही सामान  ठेवू नये. ९) मूल जन्मल्यावर त्याला तांदळांवर ठेवू नये. सटीची मेजवानी करू नये. गरजेशिवाय कुणी तिथे थांबू नये. १०) बाळंत होण्याची जागा आधी वा नंतर शेणाने सारवू नये. ११) बाळंतिणीने दोन महिने विहिरीजवळ अंग धुवू नये. अंग धुण्याच्या जागेवर विड्याची पाने  सुपारी ठेवू नये. १२) बाळाला वर्षाच्या आत दायज्यांच्या घरी वा गोत्रीच्या घरी नेऊ नये.  १३) लग्न झालेली मुलगी मोठी झाली (न्हाण आले) म्हणून उत्सव साजरे करू नयेत. मेजवानी, केळी, फुलं यासारखे काहीही देऊ नये. १४) कोणी मृत झालेली जागा, वापरण्याठी शेणाने सारवू नये. १५) मृत माणसाचे कपडे, नदी समुद्रात न टाकता, जाळून टाकावेत. (क्रमशः)

[संदर्भ-पुस्तक-' स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास'  मनोहर हिरबा सरदेसाई ]