बारा गावची जत्रा

पावसाळा संपून हिवाळा सुरू होतो. गुलाबी थंडी पडू लागते आणि गावोगावच्या मंदिरातून काले, जत्रा सुरू होतात. जत्रेचा दिवस तिथीनुसार ठरलेला असतो. कितीही कडाक्याची थंडी पडली तरी सुद्धा गावातील तसेच गावाबाहेरील भाविक आपल्या देव-देवतांच्या उत्सवाला सवड काढून आवर्जून उपस्थित राहतात.

Story: लोकसंस्कृती | पिरोज नाईक |
04th December 2021, 11:37 Hrs
बारा गावची जत्रा

गावची जत्रा म्हणजे आनंदाचे उधाण आणणारा दिवस. जत्रा एकाच दिवसासाठी असली तरीसुद्धा मंदिराचा सारा परिसर फुलून गेलेला असतो. विजेची रोषणाई, मिठाईची, खेळण्याची दुकाने थाटली जातात. लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांनाच उत्सुकता असते. सगळेच उत्साहाने जत्रेत सहभागी होतात.

 दिवजांची जत्रा म्हणजे सुवासिनींच्या उत्साहाचा दिवस. या दिवशी त्यांचा उपवास असतो. दिवज असलेल्या सर्व महिला या दिवशी भारतीय परंपरागत वेषभूषेमध्ये पहावयास मिळतात.  नऊवारी लुगडं,  हातात हातभर बांगड्या, नाकात नथ, केसांचा अंबाडा, अंबाड्यावर फुलांची झगझगीत वेणी, दागदागिने अशा पेहरावामध्ये नटूनथटून हातात दिवज घेऊन आपल्या आराध्य दैवताला ओवाळतात. जीवनातील अंधकार नाहीसा करून जीवन सतत प्रकाशमय करण्याची प्रार्थना करतात. दिवज विशेषतः मातीपासून बनवलेले असते. या दिवजाला कलात्मकतेने आकार दिलेला असतो. त्यामुळे ते हातात धरायला सोपे जाते. शिवाय ते थंडपणे पेटते. गरम होत नाही. त्यामुळे परंपरागत ज्येष्ठ सुहासिनीच्या हातात मातीचे दिवस पहावयास मिळते. 

कार्तिकी अमावास्येला बारा गावांमध्ये दिवजांची जत्रा असते. सातेरीभाट, वळवई, कुंकळी, कुंडई, खांडेपार, आमोणे, बोणये अशा विविध ठिकाणी या दिवशी दिवजे पेटतात म्हणून या जत्रेला ‘बारा गावची जत्रा’ असे म्हणतात. 

आमोणे गावचा दसरा हा त्या बारा गावांपैकी असाच एक जत्रोत्सव. डिचोली तालुक्यातील आमोणे हा गाव मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे.  देव-देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावात किती तरी भव्यदिव्य अशी मंदिरे पहावयास मिळतात. नवसाला पावणारे, संकटकाळी भक्तजनांच्या हाकेला धावून येणाऱ्या जागृत देवस्थानांचे माहेरघर असा आमोणे गावाचा नावलौकिक आहे. म्हणून तर तिथे देवाच्या कौलासाठी शेकडो लोक गर्दी करतात. श्री बेताळ देवाच्या थोरल्या दसऱ्याच्या निमित्ताने दिवजोत्सव साजरा करतात. कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी अमृतेश्वर म्हणजेच श्री महादेवाच्या मंदिरातून श्री सातेरी देवीचा कळस गावच्या सीमेवर असलेल्या सातेरी देवीच्या आदिस्थानाकडे जातो व तेथे मुक्काम करतो. यावेळी पारंपरिक दिव्यांची आरास केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवजोत्सव साजरा होतो. जमलेल्या भाविकांना देवी कौल देते व नंतर मिरवणुकीने देवीचा कळस अमृतेश्वराच्या मंदिरात आणतात. सायंकाळी बेताळ मंदिरात दसरोत्सव साजरा केला जातो. यावेळी पूर्वस बेताळ मंदिरात बेताळ देवाचे तरंग बांधतात. कार्तिक वद्य पंचमीपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाची कार्तिक वद्य चतुर्दशीच्या दसरोत्सवाने सांगता होते. मंदिरात सतत नऊ दिवस भजन, कीर्तनाचे कार्यक्रम असतात. श्री बेताळ देवाची अश्वारूढ उत्सव मूर्ती मखरात बसवून आरती, ओवाळणी करतात हे दृश्य खरोखरच विलोभनीय असते. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सर्व मानकरी जमून खेत्र, गाऱ्हाणे झाल्यानंतर श्री देव बेताळ सोने लुटण्यास जातो. विधीवत धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री देव बेताळाचे तरंग रवळनाथ मंदिरात आणून ठेवतात. त्यानंतर तरंग अमृतेश्वर मंदिरात नेतात. तेथे मानसन्मान स्वीकारून बेताळ देवाचे तरंग व श्री सातेरीदेवीचा कळस श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात आणतात. येथे समस्त मानकऱ्यांना व भाविकांना कौल देतात सर्वांना कौल देऊन झाल्यानंतर देवी सातेरी, श्री शांतादुर्गा व बेताळ देव आपआपल्या मंदिरात जातात.

तिसऱ्या दिवशी सकाळी अमावास्येच्या दिवशी गावातील सुवासिनी महिला  दिवज पेटवून देवांची ओवाळणी करतात व उत्सवाची सांगता होते. असे सांगतात की, शारदीय नवरात्रोत्सवाच्यावेळी विजय संपादन करण्याच्या कामगिरीवर गेलेल्या देवांना मंदिरात पोहोचेपर्यंत उशीर होतो. त्यामुळे दसरोत्सव (विजयादशमी) साजरी करण्याचे राहून जाते. म्हणून यावेळी दसरा साजरा करून विजयी होऊन आलेल्या देवांची ओवाळणी करतात. यालाच ‘व्हडलो दसरो’  असे म्हटले जाते.