रताळ्याची पुरणपोळी

पुरणाऐवजी रताळ्याचे सारण घालून पुरणपोळी करायची. एखादी गोष्ट करायची म्हटलं, की मला ती केल्याशिवाय चैन पडत नाही. मी लगेच ती केली सुद्धा आणि सगळ्यांची वाहवा मिळवली.

Story: अन्नपूर्णा । शीतल लावणीस, डिचोली, ९६०४ |
03rd December 2021, 11:59 pm
रताळ्याची  पुरणपोळी

शाळेत नोकरीला लागून अवघा महिना लोटला होता. तोपर्यंत शाळेतील स्टाफची बऱ्यापैकी ओळख झाली होती. आम्ही सारे मिळून मिसळून वागत होतो. शाळा म्हणजे दुसरं घरच जणू. स्टाफपैकी कुणाचा वाढदिवस असेल तर ती व्यक्ती  घरून काहीतरी  गोड पदार्थ आणायची.ज्यांना शक्य नसेल तर बाहेरून मागवायची आणि मग आम्ही  मधल्या सुट्टीत  मजेत खायचो.

एके दिवशी एका सहकाऱ्याच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यासाठी आम्हाला त्यांनी आग्रहाने बोलवले होते. नाही म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत  नव्हता. मुलासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून भेटवस्तू घेतली व आम्ही गेलो. बर्थडे बॉयला "हॅप्पी बर्थडे" म्हटले. केक कापून झाला. मग आम्ही खाण्यासाठी बसलो. काही जिन्नस बाहेरून मागवलेले तर काही घरात तयार केलेले. सगळ्यांनी ताव मारण्यास सुरुवात केली. तिथे मांडलेल्या पदार्थांपैकी एका पदार्थाने माझे लक्ष  वेधून घेतले. मला तो पदार्थ खायचा मोह आवरेना. मी पटकन तो पदार्थ उचलून खायला सुरुवात केली.  तो पदार्थ रताळी घालून केलेला. पुरणपोळीसारखा. मला तो खूप आवडला. मनात म्हटलं पुरणाऐवजी रताळ्याचे सारण घालून पुरणपोळी करायची. एखादी गोष्ट करायची म्हटलं, की मला ती केल्याशिवाय चैन पडत नाही. मी लगेच ती केली सुद्धा आणि सगळ्यांची वाहवा मिळवली. आज त्याचीच कृती मी तुमच्यासमोर देत आहे. नक्कीच करून पहा.

रताळ्याची  पुरणपोळी

साहित्य:

५००   ग्रॅम रताळी,

पाऊण कप गूळ,

दीड कप गव्हाचे पीठ,

२ चमचे साजूक तूप,

१ चमचा वेलची पूड,

चवीपुरते मीठ.

कृती:

बाजारात २ प्रकारची रताळी येतात. एक पांढऱ्या रंगाची व दुसरी लाल रंगाची. शक्यतो पांढऱ्या रंगाची रताळी घ्यावीत. प्रथम मीठ घालून गव्हाचे पीठ मळून घ्यावे व बाजूला ठेवावे. रताळी उकडून घ्यावी. गरम  असतानाच साली काढाव्यात, लवकर निघतात. मॅशर  किंवा पुरणयंत्राने  त्याचा  लगदा करावा.

गॅसवर कढई ठेवावी. त्यात साजूक तूप घालावे. तूप  वितळले की त्यात  रताळ्याचा  लगदा घालावा आणि त्यात गुळ घालून ते मिश्रण एकजीव करावे. त्यात वेलचीपूड घालावी. मिश्रण आळल्यावर गॅस बंद करावा. आता रताळ्याच्या मिश्रणाचे मोठे गोळे करावेत. तसेच मळून ठेवलेल्या गव्हाच्या पिठाचे गोळे करावेत. हे गोळे  रताळ्याच्या पुरणापेक्षा लहान करावे. रताळ्याच्या पुरणाचे  सारण भरून  पुरणपोळ्या कराव्यात. आवडीप्रमाणे  वर तूप  लावून किंवा तुपात बुडवून  आस्वाद घ्यावा.