पितृदेवो भव

शेजारधर्म कसा पाळावा हे तर मी त्यांच्याकडूनच शिकले. माझ्यावर आणि माझ्या सगळ्या भावंडांवर त्यांनी चांगलेच संस्कार केले.

Story: माझे बाबा । अमिता भाटकर सांबारी, ९८२२ |
03rd December 2021, 10:50 Hrs
पितृदेवो भव

मातृदेवो भव ,पितृदेवो भव:' बाबांविषयी खूप काही सांगावेसे वाटते. माझे बाबा माझ्या जीवनातील एक आदर्श व्यक्ती आहेत. ते खूप विनम्र आणि शांत व्यक्ती होते. माझे बाबा माझे खरे मित्र आणि मार्गदर्शक होते. त्यांचे खरे नाव श्री.गणेश नायक भाटकर असे होते,परंतु ते मधु भाऊ किंवा दोतोर ह्या नावाने ओळखले जात होते.ते गोवा मेडिकल कॉलेजमधील  orthopaedic department मध्ये  supervisor होते. त्यांचा दिनक्रम मला आवडायचा. पहाटे ५ वाजता उठून ते अंगण झाडायचे, सगळ्या झाडांना पाणी घालायचे, नंतर देवघरात लागणारी भांडी घासून, देवारा पुसून स्वच्छ करून ठेवायचे. एवढ सगळं झाल्यावर व्यायाम करायचे. नंतर सर्वांसाठी सकाळचा पहिला चहा तयार ठेवायचे. शनिवार रविवार तर त्यांचा अजून कामाचा दिवस, त्या दिवशी तर ते आपले, सर्व कपडे धुवून काढायचे आणि रविवार त्यांनी कपड्यांना इस्त्री करायला ठेवलेला. जुन्या काळची इस्त्री, ती सुद्धा गरम इंगळे घालून वापरायची. बाबा आपली स्वतःची कामे स्वतःच करायचे, तेही वेळेतच. माझे बाबा आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ होते.

कुटुंबातील एखाद्या सदस्याला कुठे काही लागलं, खरचटलं, तर माझे बाबा लगेच घरचे डॉक्टर! ते हातात tetanus चे injection घेऊन हजर! अशी दर एकाची ते जातीने खबर ठेवायचे. खूपच कष्टाळू व नम्र. नेहमी गरजू, गरीब लोकांना मदत करायचे. आमच्या चाळीतले तर ते डॉक्टर होते. रात्री अपरात्री शेजारी कुणी आजारी पडले, तर ते बाबांना उठवायला यायचे आणि हे तर जणू गरिबांचे कैवारीच म्हणायला हरकत नाही. शेजारधर्म कसा पाळावा हे तर मी त्यांच्याकडूनच शिकले. माझ्यावर आणि माझ्या सगळ्या भावंडांवर त्यांनी चांगलेच संस्कार केले. नेहमी माझ्या कलागुणांना वाव द्यायचे. जीवनात मी यशस्वी व्हावे म्हणून प्रोत्साहन द्यायचे .मी रात्री उशिरापर्यंत अभ्यासाला बसायची. मला झोप लागू नये, ह्याची काळजी त्यांना असायची, मध्येच उठून रात्रीचे flask मध्ये मला कॉफी करुन ठेवायचे. 

माझ्या एकुलत्या एक भावाच्या अपघाती अकाली मृत्यूमुळे ते पार खचून गेले. तरीही वयाच्या ७५ व्या वर्षी, कुटुंब चालावे म्हणून हॉटेल व्यवसाय पाहत होते. नंतर शरीराने साथ देणे सोडले. तेव्हापासून माझ्याजवळ येवून राहायचे. देव कुठेतरी असतो आणि तो कोणत्या न कोणत्या रूपाने आपल्याला भेटतोच. मुलींच्या बाबतीत चारही जावई त्यांना चांगलेच मिळाले होते. मी शाळेत शिक्षिका आहे ह्याचा त्यांना अभिमान वाटायचा. म्हणायचे," मुली तू ह्याहूनही पुढची पायरी गाठणार. पण तेव्हा मी कदाचित असेन किंवा नसेन, परंतु नेहमी एक गोष्ट लक्षात असू दे आपण कितीही मोठे शिखर गाठले तरी आपले पाय जमिनीवरच राहू देत. कधीही कुणाला दान केल्यास ह्या हाताचे त्या हाताला कळू देऊ नकोस. चांगले कर्म करीत रहा परंतु फळाची अपेक्षा कधीच करू नकोस." हीच मला त्यांच्याकडून मिळालेली पुंजी आहे आणि त्याच वाटेवर मी अजून माझे पाय रुजवून आहे, ह्यात शंका नाही. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली, तेही मुंबईला. माझ्या ताईच्या घरी. त्यांच्या अंतिम दर्शनास जेव्हा मी गेले होते, तेव्हा त्या थोर वडिलांसाठी माझ्या तोंडून आणि इतर बहिणीच्या तोंडून एकच उद्गार निघाले, " हेच बाबा आम्हाला जन्मोजन्मी मिळू दे."