खून प्रकरणी संशयित अल्पवयीन असल्याचे सिद्ध

बाल न्याय मंडळाने सुटका करून केले कुटुंबियांच्या स्वाधीन

|
30th November 2021, 10:50 Hrs
खून प्रकरणी संशयित अल्पवयीन असल्याचे सिद्ध

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
हणजूण येथील एका हॉटेलात काम करणाऱ्या विश्वनाथ सदाशिव गवस (२६, पिकुळे - दोडामार्ग) या युवकाचा २०२० मध्ये सहकारी कर्मचाऱ्याने सुऱ्याने भोसकून निर्घृण खून केला होता. या प्रकरणातील संशयित घटनेवेळी अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाल्यामुळे उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला बाल न्याय मंडळाकडे सुपूर्द केले. त्यानंतर बाल न्याय मंडळाने त्याची सुटका करून त्याला कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
हणजूण येथील एका हॉटेलात काम करणाऱ्या विश्वनाथ सदाशिव गवस याचा २० जून २०२० रोजी रात्री जेवताना क्षुल्लक कारणावरून सुऱ्याने भोसकून निर्घृण खून झाला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडे आधार कार्ड मिळाले होते. त्यानुसार त्याचे वय १८ वर्षाहून जास्त असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून भारतीय दंड संहितेअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संशयिताविरोधात १७ आॅक्टोबर २०२० रोजी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर खटला सुरू असताना संशयिताने त्याचे जन्म प्रमाणपत्र दाखल करून घटनेवेळी तो अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयात मांडला. याची दखल घेऊन न्यायालयाने याबाबत पोलिसांना चौकशी करण्याचा आदेश जारी केला. या प्रकरणी पोलिसांनी त्या जन्म प्रमाणपत्राची खातरजमा केली असता, ते खरे असल्याचे समोर आले. त्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय मंडळाला संशयिताचे वय तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर संशयिताचे वकील मायकल नाझारेथ यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा न्यायालयात सादर करून अशा प्रकरणात जन्म प्रमाणपत्र गृहीत धरण्याचा दावा केला. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाची दखल घेऊन संशयित घटनेवेळी अल्पवयीन असल्याचा निवाडा सोमवारी दिला. तसेच संशयिताला बाल न्याय मंडळाकडे उपस्थित करून पुढील कारवाई करण्याचा निर्देश जारी केला. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हणजूण पोलिसांनी संशयिताला बाल न्याय मंडळाकडे उपस्थित केले असता, त्याची सुटका करून मंडळाने त्याला कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, घटनेवेळी संशयित अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाल्यामुळे खून प्रकरणाची कारवाई आता बाल न्याय मंडळात होणार आहे.